स्थैर्य, फलटण दि.०३: राजकारणात यश येवो अथवा न येवो, समाजासाठी आपण सदैव कार्यरत राहिले पाहिजे. दिगंबर आगवणे यांचे समाजाप्रती असणारे प्रेम, आपुलकी मला पहायला मिळाली म्हणून आपण आज त्यांनी उभारलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
दिगंबर आगवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाठार निंबाळकर येथे सुरु करण्यात आलेल्या एक हजार बेडच्या कोरोना मोफत उपचार केंद्राचे आ. निलेश लंके आरोग्य मंदिर असे नामकरण व लोकार्पण सोहोळा आ. निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रल्हादराव साळुंखे पाटील, सुभाषराव शिंदे, दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले, डॉ. वल्लभ कुलकर्णी यांच्या सह विविध गावचे सरपंच व अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्यावेळी फलटण तालुक्यातील रुग्ण आमच्या कोवीड सेंटरमध्ये येवून भरती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच दिवशी संध्याकाळी दिगंबर आगवणे त्या पेशंटला भेटायला पारनेरला आले. फलटणमध्ये आम्ही कुठे कमी पडतोय? हे जाणून घेण्याची त्यांची तळमळ होती. आपल्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी ते तात्काळ इतक्या लांब आले यातून त्यांची फलटणवासियांबद्दल असलेली आत्मियता स्पष्ट दिसून आली, असे नमूद करुन आ.लंके पुढे म्हणाले, कोरोनाची मोठी धास्ती लोकांच्या मनामध्ये असल्याने पॉझिटीव्ह आला की तो घाबरुन जातो, मला योग्य उपचार, बेड, ऑक्सिजन गरज पडल्यास व्हेंटीलेटर मिळाला नाही तर माझे जीवनच संपले या भीतीने तो घाबरतो, त्याचप्रमाणे पॉझिटीव्ह आलो तर काय या भीतीने टेस्ट केली जात नाही त्यासाठीच कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना औषधोपचारापेक्षा आधार देण्याची, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आ. निलेश लंके यांनी निदर्शनास आणून दिले.
कोरोना या महामारीत पक्ष, जातपात न पहाता जीव वाचविणे महत्वाचे असून आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून काम करणे महत्वाचे आहे इथल्या लोकांविषयी ती भावना, प्रेम, आपुलकी दिंगबर आगवणे यांच्यात आपल्याला ते फलटणच्या रुग्णावर पारनेरच्या कोरोना केंद्रात उपचार झाल्याचे प्रसिद्ध होताच धावत तेथे आले, त्या रुग्णांविषयी विचारपूस केली त्यावेळी दिसून आले, हा सच्चा समाजसेवक असल्याचे मनोमन पटले म्हणूनच आज येथे आल्याचे आ. निलेश लंके यांनी निदर्शनास आणून दिले.
गेले वर्षभर कोराना सुरु झाल्या पासून आपण कोराना रुग्णांसाठी काम करीत आहोत. या महामारीत पक्ष राजकारण बाजुला ठेवुन काम करणे गरजेचे आहे प्रत्येकाचे दुःख समजून घेतले पाहीजे, प्रत्येकाचे आश्रु पुसले पाहिजेत, लोक मदत करतात पण प्रत्यक्षात काम कोण करीत नाही, कोरोना झाल्यानंतर घरातील लोकही जवळ येत नाहीत तिथेच रुग्ण अर्धमेला होतो, अशा परीस्थितीत रुग्नाला औषधापेक्षा आधाराची गरज असते आणि ते काम आम्ही करत असल्याचे सांगत प्रत्येकांने जबाबदारी म्हणून काम न करता कर्तव्य म्हणुन काम केले पाहीजे, प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहीजे असे स्पष्ट प्रतिपादन आ. लंके यांनी केले.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर दिगंबर आगवणे यांनी प्रास्तविकात, फलटण मधील एक मुलगा पारनेर येथे उपचारासाठी दाखल झाल्याचे समजल्यानंतर या व्यक्तीला आपण भेटले पाहीजे म्हणून आपण त्यांच्या सेंटरला भेट दिली त्यावेळी मानव सेवेचे फार मोठे काम आ. लंके यांचे असल्याचे पाहिले, त्यांची कामाची पध्दत पाहुन आपण प्रभावित झालो व फलटण येथे अशा पध्दतीचे कोविड सेंटर उभे करण्याचा मानस ठेवला व त्यांच्या हस्ते आज उद्घाटन होत असल्याचे समाधान असुन आपण या सेंटरला निलेश लंके आरोग्य मंदीर हेच नाव देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. दिंगबर आगवणे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसेवेत दाखल होत असलेल्या रुग्नवाहीकेचे लोकपर्ण आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आले.
दिगंबर आगवणे यांनी समाजसेवेची ग्वाही देत यापूर्वी आपण समाजसेवेला प्राधान्य देऊन केलेल्या कामाचा आढावा घेत कधीही चुकीचे काही केले नाही, यापुढे करणार नाही याची ग्वाही दिली.