दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । वडूज । खटाव तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असलेल्या वडूज नगरीमध्ये सर्व शासकीय कार्यालय आहेत. यापैकी जमिनीशी निगडित असलेल्या महसूल व वन विभागाच्या अधिक्षक भूमी अभिलेखा कार्यालय सध्या जमिनीची मोजणी व इतर कामे केली जातात. परंतु, सध्या कार्यालयाच्या परिसरातील रिकाम्या बाटल्यांची मोजमाप करणे कठीण झाल्याचे दिसून आले आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज नगरीमध्ये हुतात्मा विद्यालयाच्या मागे पेडगाव रस्त्यावर भूमी अभिलेखा कार्यालय आहे. त्याच्या शेजारीच खटाव तहसीलदारांसाठी निवासस्थान आहे. परंतु, या ठिकाणी शासकीय सुट्टी व रात्रीच्या वेळी काही तळीराम मंडळींची कॉन्फरन्स भरत असते. या कॉन्फरन्स नंतर रिकामी ग्लास बाटल्या व सिगरेटची थोटकी,चकना, गुटख्याच्या पुड्या त्या ठिकाणी टाकून दिल्या जातात. सकाळी शासकीय कार्यालयात येताना येथील कर्मचाऱ्यांना या रिकाम्या बाटल्या उचलून कार्यालयाच्या दूरवर फेकून द्यावे लागतात. हे नेहमीच कामकाज असल्यामुळे या ठिकाणी लोखंडी दरवाजे बसवले. परंतु, या दरवाज्याचे कडी कोयना सुद्धा तोडून टाकण्यात आलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखात्यारित असलेल्या या कार्यालयामध्ये जमीन मोजणी व इतर संबंधित कागदपत्रासाठी शंभर ते दीडशे लोक रोज येतात. या ठिकाणी संरक्षण भिंत आहे. या ठिकाणी तळीराम येऊन आपला रंगीत कार्यक्रम बिनधास्तपणे करतात. त्यामुळे या परिसराला ‘ओपन बार’ अशी उपमा दिली जाते. मुळातच निर्जन व शांत ठिकाणी असलेल्या या भागात वर्दळ कमी असल्यामुळे काही तळीराम नियमितपणे येतात. पार्सल घेऊन येतात पण जाताना पुरावा म्हणून रिकाम्या बाटल्या व रिकाम्या पुड्या त्या ठिकाणीच विसरून जातात. त्यांनी निदान या रिकाम्या पडलेल्या ग्लास व पुड्या कागदी पिशवीत टाकून त्या एका बाजूला ठेवल्या तर स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी त्या कचराकुंडीत टाकण्याची आम्ही सौजन्य करू. असे आता अभ्यागत व अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही गोष्टी या लोकांनी स्वयं स्मृतीने पाळल्या पाहिजेत. शिस्तीने राष्ट्र मोठे होते हे सर्वांनाच पटते. पण शिस्त नको अशी अवस्था पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख कार्यालयातील भिंत वाढवावी किंवा चारी बाजूने लोखंडी जाळी बसवावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केली आहे. सध्या या कार्यालयामध्ये दि १ जानेवारी 22 ते ३१ डिसेंबर २२ या कालावधीमध्ये २२०० प्रकरणाचा ऑनलाईन निपटारा केलेला आहे. ड्रोनच्या साह्याने खटाव तालुक्यातील ९२ महसूल गावे व वाड्यावर या अशा मिळून १४२ गावांचा सिटी सर्व्हे पूर्ण झाल्याची ही माहिती यावेळी भूमी अभिलेखा कार्यालयातील अध्यक्ष श्री साळुंखे यांनी दिली. यावेळीला वडून नगरीचे नगरसेवक सुनील गोडसे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे व मान्यवर उपस्थित होते.