दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2024 | फलटण | विडणी गावचे सुपुत्र व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अवर सचिव धीरज कांतीलाल अभंग यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विडणी गावात अनेक उत्साही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्तरेश्वर मंदिर, विडणी येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील 138 युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. ग्रामपंचायतीच्यावतीने रक्तदान करणार्या युवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सरपंच सागर अभंग, ग्रामविकास अधिकारी ए. एन. टेंबरे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त गावातील विविध तरुण मंडळे तसेच विविध संस्था, पतसंस्था, प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांच्यावतीने धीरज अभंग यांचा सत्कार करण्यात आला. शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी फंड’ नावाची योजना चालू करण्यात आली, ज्याचा फायदा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे.
सायंकाळी 7 वाजता धीरज अभंग यांच्या राहत्या घरी वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास विडणी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धीरज अभंग यांना वाढदिवसानिमिताने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
धीरज अभंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमांनी समाजातील एकता व सामाजिक सेवेची भावना जागृत केली. असे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू वर्गाला मदतीला येते व त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होते.