
अंबवडे (ता. कोरेगाव) हद्दीत धोम धरणाच्या डाव्या कालव्याचे कुलूप तोडून अज्ञाताने पाणी वांगणा नदीत सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे कालव्याचे आवर्तन विस्कळीत झाले असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, कोरेगाव, दि. ३१ मार्च : अंबवडे संमत कोरेगावच्या हद्दीत धोम धरणाच्या डाव्या कालव्यावरील पाणी सोडण्याच्या दरवाजाची साखळी आणि कुलूप तोडून अज्ञातांनी कालव्यातील पाणी थेट वांगणा नदीत सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या विघ्नसं संतोषी कृत्यामुळे वांगणा सिंचन योजना बंद पडल्या असून डाव्या कालव्याचे आवर्तनही विस्कळीत झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक मालमत्तेसह पिकांचे नुकसान
अंबवडे संमत कोरेगावच्या हद्दीमध्ये धोम डावा कालवा साखळी क्रमांक ५१/००० येथे हा प्रकार घडला. कोणीतरी अज्ञात इसमाने दरवाजाची (अतिवाहक दार) साखळी आणि कुलूप तोडून पाणी वांगणा नदीपात्रात वळवले. यामुळे कालव्यावरील वांगणा सिंचन योजना अचानक बंद पडल्या. पाण्यावाचून शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.
पाटबंधारे अधिकाऱ्यांची तत्परता; पाणीपुरवठा पूर्ववत
कालव्याचे पाणी नदीत सोडल्याची माहिती मिळताच धोम पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित दरवाजाला नवीन साखळी आणि कुलूप लावून नदीत जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला. या तत्परतेमुळे कालव्याच्या अखेरच्या भागापर्यंत म्हणजेच कोरेगाव आणि रहिमतपूरपर्यंत पाणी पुन्हा सुरळीत सुरू झाले.
अज्ञाताविरुद्ध गुन्हा; कडक कारवाईची मागणी
याप्रकरणी धोम पाटबंधारे विभागाच्या सातारारोड शाखेचे मोजणीदार रोहित शिवाजी बोडके (वय ३६, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार देवकी घाडगे करत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे अंबवडेपासून पुढे रहिमतपूरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पाण्याचे आवर्तन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी केली आहे.

