धोम – बलकवडी प्रकल्पाच्या पाण्यामुळे कायम दुष्काळी हा कलंक पुसण्यात यश : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । सासवड । ओढा जोड प्रकल्पामुळे पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून धोम – बलकवडी पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यामुळे कायम दुष्काळी हा कलंक श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून मिटला आहे, शेतकरी समाधानी व आर्थिक दृष्ट्या स्थिर झाला असल्याचे निदर्शनास आणून देत टाकुबाईचीवाडी येथील हा पहिला यशस्वी ओढा जोड प्रकल्प असल्याचे श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

कापशी – टाकूबाईचीवाडी ओढा जोड प्रकल्प टप्पा २ चे उद्घाटन व जलपूजन, पाणंद रस्त्याचे भूमीपूजन आ. दीपकराव चव्हाण आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, कमिन्स कंपनीचे प्रवीण गायकवाड, पंचायत समिती माजी सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ, संतकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष विलासराव नलवडे, सासवडचे सरपंच राजेंद्र काकडे सर, मस्कुआबा अनपट, विनायक अनपट, पराग भोईटे, जगदीप भोईटे, विकास भोईटे, घाडगेमळा सरपंच संतोष जगताप, शामराव कणसे, विजय काटकर, महेश अनपट, गणेश पवार, निलेश झणझणे, टाकूबाईच्यावाडीचे सरपंच कुणाल झणझणे, वैशाली काटकर, सौ. नितिषा शेलार, नारायण खोमणे आदी मान्यवरांसह सासवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी, तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३० वर्षात तालुक्यातील कायम दुष्काळी पट्टयात कृष्णेचे पाणी पोहोचवून या भागातील शेती खऱ्या अर्थाने विकसीत करण्यात आली, श्रीमंत रामराजे यांच्या दूरदृष्टीतून फलटण तालुक्‍याचा कायापालट झाला आहे. येणार्‍या काळात शेती सुद्धा चांगले उत्पन्न देणार आहे. या भागात पाणी, औद्योगिक वसाहती आणि रोजगार याचे मोठ्या प्रमाणात जाळे विणले गेल्याने विशेषत: कमिन्स सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प किंवा लोणंद औद्योगिक वसाहतीमधील प्रकल्पांमुळे येथील तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. येणार्‍या काळात शेती सुद्धा चांगले उत्पन्न देणार आहे. भविष्यात या भागाचा पूर्णपणे कायापालट झालेला दिसेल याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

संपूर्ण फलटण तालुक्यात रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य वगैरे नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध होत असताना सासवड जिल्हा परिषद मतदार संघासह तालुक्याच्या पश्चिम भागाला श्रीमंत रामराजे यांनी झुकते माप देवून विकास कामांचा अनुशेष भरुन काढल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळेच संपूर्ण राज्यातील कायम दुष्काळी पट्टयात कृष्णेचे पाणी पोहोचवून त्या भागावरील कायम दुष्काळी हा कलंक पुसण्यात मोठे यश प्राप्त झाले ही वस्तुस्थिती आहे. श्रीमंत रामराजे योग्यवेळी विधान सभेत पोहोचल्याने राज्याच्या वाट्याचे ५९४ टीएमसी पाणी अडविता आले अन्यथा ऑगस्ट २००० नंतर राज्याच्या वाट्याचे पाणी कर्नाटकला गेले असते तर कायम दुष्काळ ही बिरुदावली कायमचीच चिकटली असती याची आठवण करुन देत श्रीमंत रामराजे यांनी मुदतीत पाणी अडवून फेर वाटपात राज्याला आणखी १८५ टीएमसी पाणी उपलब्ध करुन घेतल्याचे आ. दीपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रारंभी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा यथोचित सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात सासवड जिल्हा परिषद मतदार संघात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा घेताना या भागातील रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केल्याने त्यासाठी श्रीमंत रामराजे, आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध रस्ते विकास योजनांतून भरीव निधी उपलब्ध झाल्याने या भागातील सर्व रस्ते उत्तम झाले आहेत, धोम – बलकवडी प्रकलपामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेती विकसीत झाली आहे, ओढा जोड प्रकल्पामुळे टाकूबाईच्यावाडीतील सुमारे ३०० एकर आणि आता दुसऱ्या टप्प्यात मोठे क्षेत्र ओलिताखाली आल्याने या परिसराचा दुष्काळ कायमचा हटल्याचे नमूद करीत याचे संपूर्ण श्रेय श्रीमंत रामराजे यानाच द्यावे लागेल, आगामी काळात नीरा – देवघरचे पाणी पोहोचणार असल्याने तसेच कमिन्स प्रकल्पामुळे आता विकास प्रक्रिया गतिमान झाल्याचे दत्ता अनपट यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल झणझणे यांनी केले, समारोप व आभार कुणाल झणझणे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!