कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना फलटण तालुक्यातील सर्व सदस्यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत शासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या सूचनेनुसार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही राज्याचे शिक्षणमंत्री आश्वासित मागण्यांवर निर्णयांची अंमलबजावणी करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार यावर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यावर्षी शिक्षक दिन ‘अन्याय दिवस’ म्हणून या दिवशी आंदोलन करून सरकारच्या निषेधार्थ फलटण तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन दिले.

सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना फलटण तालुक्यातील सर्व शिक्षकांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ, विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा. राज्यातील अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ देण्यात यावी. मान्यताप्राप्त आयटी शिक्षकांच्या समायोजनाबाबतचा शासनादेश त्वरित निर्गमित करण्यात यावा. शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी. निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी. ब व क प्रपत्रातील वाढीव पदांच्या तसेच दोन विषयात शैक्षणिक अर्हता असणार्‍या शिक्षकांचे दोनपैकी कुठल्याही विषयाच्या रिक्त पदावर समायोजनाचे अधिकार संबंधित शिक्षण उपसंचालकांना देण्यात यावेत. वाढीव पदावरील अर्धवेळ शिक्षकांना अर्धवेळच्या अनुदानित रिक्त जागा नसल्याने त्यांना त्या विषयाच्या पूर्णवेळ जागेवर समायोजित करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित करावेत. विनाअनुदानितकडून अनुदानितकडे बदली केलेल्यांचे प्रस्ताव मंत्रालयात न मागवता उपसंचालकांना बदली मान्यतेचे अधिकार पूर्वीप्रमाणे देण्यात यावेत. संचालक कार्यालयात त्रुटी पूर्तता केलेल्या प्रलंबित वाढीव पदाच्या फाईल्स त्वरित मंत्रालयात मागवून त्या पदांना मान्यता देऊन त्यांच्या समयोजनाचे त्वरित आदेश द्यावेत. सद्यस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात २१ विद्यार्थी व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नितमध्ये ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत. एम.फिल., एम.एड्., पीएच.डी. धारक क. म. वि. शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकांप्रमाणे वेतनवाढ लागू करावी व केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० करावे. उपदानाची रक्कम २० लाख करण्यात यावी. निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे. डीसीपीएस/एनपीएस योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व देय रक्कम देण्यात यावी. तसेच शासन निर्णय दि. २३/०२/२१ नुसार वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा कार्यभार सतत तीन वर्षे कमी झाला, शून्य झाला तरच अतिरिक्त घोषित करावे. अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयातील अ़ंशकालीन घड्याळी तासावरील शिक्षकांना शासकीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे मानधन द्यावे. कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी. अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवेळ सेवेचा कालावधी वेतनवाढ व इतर लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा.

वरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षण मंत्र्यांचे व सरकारचे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद वाघ, जिल्हा संघटक प्रा. सतीश जंगम, समिती सदस्या सौ. नीलम देशमुख, तालुका अध्यक्ष प्रा. पंकज बोबडे, प्रा. लोंढे, प्रा. एस. एल थोरात, प्रा. एच. के. फरांदे, प्रा. डी. डी. सस्ते, पी. एम. शिंदे, एस. एल. राऊत, एस. व्ही. गायकवाड, एस. एम. मेटकरी यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!