दैनिक स्थैर्य । दि. 11 आक्टोंबर 2024 । फलटण । देव, देश आणि धर्म यासाठी लढताना किंवा यातील संकट प्रसंगी न डगमगता धैर्याने त्यावर मात कशी करावी हे धर्मवीर छ. संभाजी महाराज यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले, किंबहुना त्याविषयी शिकवण दिल्याचे निदर्शनास आणून देत त्यांचे हे पूर्णाकृती पुतळा रुपी स्मारक पुढच्या अनेक पिढ्यांना तशी शिकवण आणि ऊर्जा देत राहील असा विश्वास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
शहराच्या मुख्य भागात, अधिकार गृह परिसरात, प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन प्रांगणात उभारण्यात आलेल्या धर्मवीर छ. संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. अध्यक्षस्थानी पुतळा समितीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी आ. दिपकराव चव्हाण, भवानीसिंह घोरपडे, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, पुतळा समितीचे पदाधिकारी आणि फलटण शहर व तालुक्यातील शिवप्रेमी अबालवृद्ध उपस्थित होते.
राज घराण्यांचे संबंध इतिहास कालीन व पिढ्यानपिढ्यांचे : राजकीय नव्हेत
फलटणचे नाईक निंबाळकर आणि छ. भोसले या दोन राज घराण्यांचे संबंध इतिहास कालीन व पिढ्यानपिढ्यांचे असून ते आजकालच्या राजकारणातून निर्माण झाले नसल्याचे आवर्जून सांगताना राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले यांनी राजकारणापेक्षा छ. शिवाजी महाराज यांचे विचार आणि आदर्श समाजात रुजविण्याला नेहमीच प्राधान्य दिले, तथापी सन १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी लोकहितासाठी आपण राजकारणात सक्रिय होण्याची आवश्यकता त्यांना पटवून दिल्यानंतर त्यांनी श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांना सातारा विधानसभा निवडणूक लढविण्यास सहमती दर्शविल्याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी निदर्शनास आणून दिले.
काँग्रेसने उमेदवारी दिली नाही, पण पुढे सतत यश येत गेले
राजमाता यांनी परवानगी दिल्यानंतर स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांनी मुधोजी मनमोहन राजवाडा फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांची भेट घेऊन विधानसभा लढविण्याची तयारी केली पण तत्कालीन काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी जनता पक्षातून निवडणूक लढविली आणि जिंकली मात्र पुढे ते सतत यशस्वी होत गेल्याचे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
रतन टाटांना श्रद्धांजली
रतन टाटा हे औद्योगिक क्षेत्रातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत आ. श्रीमंत छ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हा कार्यक्रम राजकीय नाही : ९ पिढ्यांचे संबंध जपणारा कार्यक्रम
छ. शिवाजी महाराज व धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे आदर्श, त्यांचे विचार,स्वराज्य रक्षणासाठी त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आणि नव्या पिढीला स्फूर्ती देणारे असल्याने त्यांची स्मारके या शहरात असली पाहिजेत ही आपली अनेक वर्षांची इच्छा आज प्रत्यक्षात येत असल्याचे आणि स्मारकाचे भूमिपूजन आणि अनावरण छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीच्या हस्ते करण्याची आपली भावना आज फलद्रूप झाल्याबद्दल आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम राजकीय नसून दोन घराण्यांचे ९ पिढ्यांचे संबंध जपण्याचा, दृढ करण्याचा हा कार्यक्रम असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
महाराणी सईबाई उचित स्मारक उभे राहते आहे
राजगडाच्या पायथ्याशी महाराणी सईबाई महाराज यांचे समाधी स्थळ असून त्या परिसरात राजगड किल्ल्यावर राजमाता जिजाऊ, छ. शिवाजी महाराज यांचे वास्तव्य त्याकाळी असल्याने हा परिसर विकसित करण्याची आणि महाराणी सईबाई यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना आपण महाराष्ट्र विधान परिषद सभापती असताना शासनास सुचविली तत्कालीन अर्थमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि सुमारे ५० कोटी रुपयांचा भरीव निधी त्या स्मारकासाठी उपलब्ध करुन दिला असून स्मारकाचे काम सध्या सुरु असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
व्हिएतनामच्या पंतप्रधानाने इथली माती नेऊन छ. देशप्रेमाची माहिती दिली
व्हिएतनाम हे छोटे राष्ट्र आहे, पण देशासाठी प्रचंड संघर्ष केलेल्या या देशाचे पंतप्रधान राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्ग पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना छ. शिवरायांचा इतिहास ऐकून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी इथली माती आपल्या देशात नेऊन देशवासीयांना देश प्रेम, त्याग, शौर्य यांच्या येथील कथा समजावून दिल्याचे निदर्शनास आणून देत ही इथल्या देश प्रेम, त्याग, शौर्याला आंतरराष्ट्रीय मान्यता नव्हे काय असा सवाल आ. श्रीमंत रामराजे यांनी उपस्थितांना केला.
मल्हारराव होळकर यांचे स्मारक उभारणी सुरु आणि म. फुले यांचा पूर्णाकृती पुतळा कृषी महाविद्यालय येथे उभारणार
मराठा साम्राज्याचा झेंडा आटकेपार लावणारे मल्हारराव होळकर हे मुरुम ता. फलटण येथील असल्याने त्यांच्या जन्मगावी उचित स्मारक करण्याचा, किंबहुना तेथे टुरिझम सेंटर उभारुन त्यांचे कर्तृत्व समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगताना त्यासाठी १५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, सध्या तेथे स्मारकाचे काम सुरु असल्याचे तसेच या शहरात म. फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उचित स्मारके उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे पूर्णाकृती पुतळे तयार असल्याचे सांगत म. फुले यांचा सध्याच्या पुतळ्याच्या जागेवर पूर्णाकृती पुतळा उभारण्याऐवजी सदर पूर्णाकृती पुतळा कृषी, उद्यानविद्या महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणार असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
छ. संभाजी महाराज यांनी धर्मांतरास नकार दिल्याने आज या देशात हिंदू व हिंदुत्व अजरामर
धर्मवीर छ. संभाजी महाराज महापराक्रमी योद्धा असल्याचे सांगत केवळ ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या छ. संभाजी महाराज यांना फक्त ९ वर्षे छ्त्रपती पद लाभले त्या कालावधीत त्यांनी आपल्या क्षात्र तेजाने पोर्तुगीज, मुघल, सिध्दी या मोठ्या साम्राज्यांना हादरे देत पराभूत केले, पण दुर्दैवाने ताब्यात घेऊन धर्मांतर करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवण्यात आला, तथापि औरंगजेब समोर नतमस्तक न होता धर्मांतराला विरोध केल्याने त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देताना त्यांनी धर्मांतरास नकार दिल्याने आज या देशात हिंदू व हिंदुत्व अजरामर असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा फलटणला
छ. शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व धर्मवीर छ. संभाजी महाराज यांचे आजोळ फलटण असल्याने त्यांची उचित स्मारके येथे असावीत अशी सर्वांचीच इच्छा असल्याने आज छ. शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले असून छ. संभाजी महाराज यांचा सातारा जिल्ह्यातील पहिला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून आज त्याचे अनावरण झाले, आगामी काळात छ. शिवाजी महाराज पुतळा ही पूर्ण होईल, त्याच बरोबर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे उचित स्मारक उभारण्याची योजना असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समित्या गठीत करण्यात आल्या असून सर्व आवश्यक मान्यता घेऊनच पुतळे उभारण्याची योजना प्रत्यक्षात येत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमापूर्वी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमोद रणवरे यांनी सूत्रसंचालन आणि आ. दिपकराव चव्हाण यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.