दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या धनश्री लंभाते यांनी विडणी (ता.फलटण) येथील दुग्ध व्यवसायातून समृद्धी साधणारे अमोल संपतराव नाळे यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना अमोल नाळे यांनी सांगितले की, ‘‘सन 1988 साली पहिली गाय विकत घेतली व दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. पुढे एका गायीच्या नफ्यातून 4 गायी विकत घेतल्या. पुढे दूध व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत सध्या एच.एफ., देशी, गीर या जातीच्या 30 गायी असून त्यांना दरमहा 70 हजार रुपये खर्च आहे. हा खर्च जावून दरमहा ऐंशी हजार एवढा नफा मिळतो. दर महिन्याला शेणखताचाही नफा मिळत असून दुग्ध व्यवसायातून 7 एकर जमीन खरेदी केली आहे.’’
शीतकरण केंद्राच्या व्यवसायाविषयी बोलताना अमोल नाळे म्हणाले, ‘‘सन 2011 साली शीतकरण केंद्र सुरु केले. त्याचे एका दिवसाचे दूध संकलन 3 हजार लिटर एवढे आहे. या शितकरण केंद्राचा दरमहा नफा 80 हजार रुपये एवढा आहे. या ठिकाणी दूध घालणार्या दूध उत्पादकाला त्यांनी किती लिटर दूध घातले, त्याची डिग्री किती, फॅट किती इत्यादी सर्व गोष्टी शेतकर्यांना शीतकरण केंद्राकडून कळवल्या जातात. तसेच दिवाळीत सर्व दूध उत्पादक शेतकर्यांना बोनसही दिला जातो.’’
या कार्यक्रमासाठी कृषीकन्या धनश्री लंभाते हिला राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले, कार्यक्रम समन्वयक डॉ.बी.टी.कोलगणे यांचे मार्गदर्शन लाभले.