उद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यस्तरावर एकत्रित काम करणार… धनंजय जामदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । बारामती । इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे अवाजवी वाढीव दर तसेच लघुउद्योगांना पायाभूत सुविधांसाठी करावा लागणारा प्रचंड खर्च, एमआयडीसी व ग्रामपंचायत यांचा अन्यायकारक दुहेरी कर, लघुउद्योगांना शासनाकडून मंजूर अनुदान मिळण्यासाठी होणारा अवाजवी विलंब, राज्यातील अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये माथाडी कायद्यासंबंधीत येणाऱ्या अडचणी अशा राज्यातील सर्व उद्योगांना भेडसावणाऱ्या समान अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांबरोबर समन्वय ठेवून राज्यस्तरावर एकत्रित प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे यांनी औरंगाबाद येथे आयोजित राज्यस्तरीय उद्योग संघटनांच्या बैठकीत दिली.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर ( म सि आ ) यांच्या पुढाकारातून चिकलठाणा औरंगाबाद येथे राज्यातील प्रमुख औद्योगिक संघटनांची एक विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

म सी आ चे अध्यक्ष किरण जगताप, उपाध्यक्ष भगवान राऊत, सदस्य अनिल पाटील, राजेंद्र चौधरी, सुरेश खिलारे, प्रल्हाद गायकवाड, दुष्यंत आठवले, मनीष अग्रवाल, अर्जुन गायकवाड, सचिन गायके, कमलाकर पाटील, सर्जेराव सोळंके, शरद चोपडे, सलील पेंडसे, रोहन येवले, श्रीकांत सूर्यवंशी, रोष होंडेकर, विरेन पाटील, हरिश्चंद्र पठाडे, कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे प्रशांत मोरे चाकण चेंबर ऑफ कॉमर्स चे किरण दिंडे, सी एम आय ए चे दुष्यंत पाटील, रवींद्र मानवतकर, उत्सव माछर, ऊर्जा मंचचे हेमंत कपाडिया, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल असोसिएशनचे मिलिंद थोरात आदींनी या बैठकीत सहभाग घेतला.

लघुउद्योगांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच उद्योगमंत्र्यांना प्रमुख औद्योगिक संघटनांनी एकत्रित भेटून पाठपुरावा करण्यात यावा असे सर्वानुमते या बैठकीमध्ये ठरले.

बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ही बारामतीच्या औद्योगिक प्रगतीसाठी कटिबद्ध असून उद्योगांच्या अडचणी सोडवणे बरोबरच उद्योजकांचा व्यवसाय वाढवण्यासाठी राज्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना भेटी देऊन उद्योजकांमध्ये परस्पर सुसंवाद निर्माण करणार असून म सी आ सह इतर प्रमुख औद्योगिक संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी याप्रसंगी केले.

 


Back to top button
Don`t copy text!