धम्म हा जीवन जगण्याची तत्वप्रणाली आहे – डॉ. केशर जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । धम्माची व्याख्या करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की “एक माणूस दुसऱ्या माणसासोबत जो व्यवहार करतो, काय तो व्यवहार समतापूर्ण, स्वातंत्र्यपूर्ण, न्यायसंगत आणि बंधुत्वाने प्रेरित आहे ? जर असेल तर त्या व्यक्तीचे आचरण धम्मप्राणित आहे, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत जो व्यवहार करतो, जे आचरण करतो तोच धम्म आहे. धम्म ही सामाजिक कल्पना आहे, धम्म ही वयक्तिक बाब नाही, कारण एक व्यक्ती, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या व्यक्तीसोबत जो व्यवहार करतो, तो व्यवहार समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता या चारही सूत्रांनी ओतप्रोत असणे गरजेचे आहे. जेव्हा एखादा व्यक्ती असा व्यवहार करतो तेव्हा त्या मनुष्याचे आचरण धम्माने अनुप्रेरीत आहे असे म्हणावे” असे प्रतिपादन धम्म आणि त्याची उत्पत्ती या विषयावर बोलत असताना डॉ. केशर जाधव यांनी केले.

बौद्धजन सहकारी संघ, मुंबई, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी व संघाशी संलग्न संस्कार समिती या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन संस्कार समिती अध्यक्ष मा. संदीप गमरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली, सूत्रसंचालनाची धुरा सरचिटणीस संजय तांबे यांनी सांभाळली.

सातवे पुष्य गुंफत असता डॉ. केशर जाधव यांनी धम्माचा उदय आणि त्याची पंधरा वैशिष्ट्ये याच सविस्तर विश्लेषण केले, त्यांनी सरळसोप्या व सहज समजेल अशा भाषेत मार्गदर्शन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, धम्माची माहिती देताना “धम्म जीवन जगण्याची तत्वप्रणाली आहे” असे मौलिक विचार केवळ डॉ. केशर जाधव यांसारखे प्रगाढ अभ्यासू विचारवंतच मांडू शकतात याची जाणीव उपस्थित श्रोत्यांना प्रत्येक शब्दागणिक होत होती.

सदर ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कमिटी, विभाग अधिकारी, आजी-माजी कार्यकर्ते, शाखांचे पदाधिकारी तसेच उपसमित्यांचे प्रमुख यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले असे प्रतिपादन संजय तांबे यांनी आभार प्रदर्शन भाषणात करून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!