
कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; सरलष्कर बहाद्दर बाबाराजे खर्डेकर यांचे नातू.
स्थैर्य, आसू, दि. २८ डिसेंबर : कोल्हापूर (दानोळी) येथील खर्डेकर राजघराण्यातील श्रीमंत देवेंद्रराजे शिबिराजे खर्डेकर यांचे कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचे चुलत बंधू होते.
देवेंद्रराजे खर्डेकर हे सरलष्कर बहाद्दर कै. श्रीमंत बाबाराजे खर्डेकर यांचे नातू, तर कै. श्रीमंत दादाराजे खर्डेकर आणि कै. श्रीमंत बंटीराजे खर्डेकर यांचे पुतणे होते. दानोळी (कोल्हापूर) येथील खर्डेकर परिवारातील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.
देवेंद्रराजे यांच्या निधनाची वार्ता समजताच खर्डेकर परिवारासह फलटण तालुक्यातील आसू परिसरात शोककळा पसरली आहे. आसू हे खर्डेकर घराण्याचे मूळ गाव असल्याने येथील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
श्रीमंत देवेंद्रराजे खर्डेकर यांच्या पार्थिवावर आज (रविवारी) दुपारी ३ वाजता कोल्हापूर येथील पेरूची बाग येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती खर्डेकर परिवाराच्या वतीने देण्यात आली.

