स्थैर्य, दि २३: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95वी जयंती आहे. या निमित्ताने विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. मात्र या व्हिडियो देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही निवडक वक्तव्यांचा उल्लेख या व्हिडिओमध्ये आहे. यातून देवेंद्र फडणवीसांनी आपला पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला चिमटे काढले आहेत अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
‘जनतेने विश्वासाने तुम्हाला निवडून दिले.पण निवडून आल्यावर तुम्ही तिकडे पळता. खुर्चीसाठी भांडायचे नाही. पैशांसाठी लाचार व्हाल तर भगवा झेंडा हातात ठेवू नका.’ असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये बोलत आहेत. तसेच अलिकडच्या राजकारणात नेत्यांची मने छोटी छोटी होतात. पण बाळासाहेबांच मन राजासारखे होते. असेही देवेंद्र फडणवीस बोलताना दिसत आहेत. तसेच तुम्ही भेसळ केली असेल त्यांच्या विचारात आम्ही नाही केली असेही फडणवीस या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. शिवसेनेने भाजपचा हात सोडत नवीन राजकीय पर्व सुरू केले. यामुळे भाजपला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपची नाराजी ओढवून घ्यावी लागली. भाजपाची ही नाराजी अजूनही कायम दूर झालेली नसल्याचे वारंवार समोर येते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ हे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतानाच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शिवसेनेला चिमटे काढले आहेत.