दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघांमधील सर्व गावांच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून आगामी काळामध्ये माढा मतदारसंघाचा विकास ठप्प होऊ देणार नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसाठी केंद्रीय पातळीवर सर्व विभागांची संयुक्तरीत्या बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिली.
दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भामध्ये भेट घेतली. मतदारसंघातील जे प्रश्न राहिलेले आहेत त्याबाबत केंद्रीय स्तरावरून लवकरात लवकर प्रश्न सुटावेत यासाठी ही भेट होती.
नीरा – देवधर, कृष्णा – भीमा स्थिरीकरण, फलटण पंढरपूर रेल्वे, फलटण व पंढरपूर येथील विमानतळासह माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी फलटण व म्हसवड येथील कॉरिडॉर एमआयडीसीसह इतर मुलभुत प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात केंद्र सरकारच्या सर्व विभागांची संयुक्त रित्या बैठक आयोजित करून त्यामध्ये प्राधान्याने सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिली.
माढा लोकसभा मतदारसंघासह सोलापुर व सातारा जिल्ह्यात भाजपाचे संघटन मजबूत करणार; खासदार रणजितसिंह यांची भाजपा पपक्षश्रेष्ठींना आश्वासन
माढा लोकसभा मतदारसंघातील तळागाळातील गावापर्यंत व त्यासोबतच सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन हे मजबूत करणार आहे. सोबतच सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीचे सत्ता येण्यासाठी आगामी काळामध्ये आम्ही सर्वजण कार्यरत राहणार आहोत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघासह सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत, असे आश्वासन यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांना दिली.