विकास सर्वसमावेशक व चौफेर असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । ठाणे । सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकास कामांचे नियोजन करताना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सिडकोच्यावतीने आयोजित केलेल्या एकदिवशीय सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभ व सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार मनोज कोटक, आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आदी मान्यवर डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थित होते.

जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम

सिडकोने केलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज आपण उपस्थिती लावलेले दोन्ही कार्यक्रम हे जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम आहेत. ठाण्यात टेंभीनाका येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रक्तदान सप्ताह असो किंवा आजच्या समर्पित कोविड केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम. या दोन्ही कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी व्यक्त झाली आहे.

सिडकोनेही अत्याधुनिक व अप्रतिम सुविधा असलेल्या दोन कोविड आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण झाले आहे. ही दोन्ही केंद्रे स्वच्छ, आखीव-रेखीव व सर्व सुविधायुक्त आहेत. कोविड काळात महाराष्ट्रात जेवढ्या आरोग्य सुविधा निर्माण झाल्या त्या जगात इतर कुठेही झाल्या नसतील. ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सिडकोला बळ देऊ

विकास करताना कोणत्याही गोष्टीला दिशा नसली तर तो विकास भरकटतो हे लक्षात घेऊन सिडकोने सर्वांशी संवाद साधत टाकलेले पाऊल खुप महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मुंबई आणि गर्दी हे समीकरण आहे. मुंबईवरचा भार हलका करण्याचे काम नवी मुंबईने केले आहे. सिडकोने नवी मुंबई निर्माण करताना कौतुकास्पद काम केले आहे. रस्ते, पाणी, वाहतूक सुविधा, शाळा,  गुंतवणुकदार यांचे मोठे जाळे इथे निर्माण केले आहे. या शहरात गुंतवणुकदारांना यावेसे वाटावे इतक्या चांगल्या पायाभूत सुविधा इथे निर्माण व्हाव्यात, गुंतवणूकदारांबरोबर नागरिकांनाही हे शहर आपले आणि राहण्यायोग्य वाटावे यादृष्टीने सिडको काम करत असून राज्याच्या विकासासाठी पाहत असलेल्या सिडकोच्या या स्वप्नाला बळ देण्याची गरज आहे. हे बळ राज्य शासनाकडून मिळत राहील, अशी ग्वाहीही मुख्यमत्र्यांनी यावेळी दिली.

सिडकोच्या प्रकल्पांमुळे अर्थव्यवस्थेला चालना – एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत उद्योग, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. सिडकोने एक आदर्श शहर म्हणून नवी मुंबई उभारले आहे. सुंदर रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, क्रीडागंणे या सुविधा उभारल्या आहेत. त्याचबरोबर अल्प व मध्यम उत्पन्नाच्या नागरिकांसाठी निवारा देण्याचे कामही सिडको करत आहे. सिडकोच्या माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पामुळे नवी मुंबई, मुंबई व रायगडमध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.

राज्यातील रस्ते दर्जेदार व्हावेत, यासाठी राज्य शासनाने सिमेंटचे रस्ते उभारण्याचे ठरविले आहे. महामुंबई क्षेत्रातील रस्तेही चांगले करण्याचे काम सुरू आहे. रस्ते, पायाभूत सुविधा यांचा विकासात महत्त्वाचे स्थान आहे. मुंबई गोवा ग्रीनफिल्ड महामार्ग, पुणे रिंगरोड अशा प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात रस्त्यांचे जाळे विणून विकासाच्या दिशेन वाटचाल करत आहोत.

कामांची माहिती जगभर पोचविण्यासाठी गुंतवणूक परिषद महत्त्वाची – बाळासाहेब थोरात

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, कोविड काळात उपचाराच्या सुविधा निर्माण होण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयानी स्वतः लक्ष घातल्यामुळे आपण कोविडच्या दोन्ही लाटेला तोंड देऊ शकलो. तिसरी लाट आली तर प्रत्येक जीवाची काळजी घेऊ हे सांगणारे काम या कोविड केंद्राच्या माध्यमातून होत आहे. सिडकोने पुढाकार घेऊन दोन्ही कोविड केंद्रे ही परिपूर्ण व सर्व सुविधायुक्त उभारली आहेत. त्याचप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून नवे विश्व उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पांची माहिती जगभर पोचविण्यासाठी गुंतवणूक परिषद महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारताना पर्यटन व पर्यावरण यांचाही विचार करावा.

कोविड सेंटरमुळे रायगडवासीयांची सोय – कु. आदिती तटकरे

रायगडच्या पालकमंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, कळंबोलीतील अत्याधुनिक कोविड आरोग्य केंद्रामुळे रायगडवासीयांसाठी मोठी सोय निर्माण झाली आहे. हे केंद्र महानगरपालिकेला हस्तांतरित झाल्यानंतर त्याची योग्य ती देखभाल केली जाईल. तिसरी लाट येऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुले व वृद्धांना असलेला धोका ओळखून या कोविड केंद्रात विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सिडकोने अत्यंत कमी काळात सर्वसुविधायुक्त हे आरोग्य केंद्र उभारले आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री.  चहल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. तसेच कांजूरमार्ग आरोग्य केंद्र कशापद्धतीने चालविले जाणार आहे, याची माहिती दिली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मुखर्जी यांनी प्रास्ताविकात गुंतवणूक परिषद व कोविड केंद्राच्या उभारणीसंदर्भात माहिती दिली. सहव्यवस्थापकीय संचालक श्री. शिंदे यांनी आभार मानले.

कळंबोलीतील कोविड आरोग्य केंद्र

  • नवी मुंबईतील कळंबोलीतील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये केंद्राची उभारणी
  • हे कोविड आरोग्य केंद्र पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये एकूण 635 खाटा आहेत
  • त्यात 505 ऑक्सिजनयुक्त खाटा, 125 आयसीयू खाटा, (यातील 25 आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहेत),
  • 5 खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव
  • रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी 24खाटांचे मदर लाउंज
  • संपर्क रहित तपासणी कक्ष, डॉक्टर आणि रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग, रूग्णांच्या देखरेखीसाठी आणि उपचारांसाठी हे आरोग्यकेंद्र सीसीटीव्ही, पब्लिक अॅड्रेस सिस्टीम,आवश्यक आयटी इन्फ्रास्ट्रक्चर व वायफाय प्रणाली इ. सुविधा

कांजूरमार्ग कोविड आरोग्य केंद्र

  • मुंबईतील कांजूरमार्ग येथील ओल्ड क्रॉम्प्टन ग्रीव्हज फॅक्टरी येथे 1738 खाटांचे कोविड समर्पित आरोग्य केंद्र
  • कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्रामध्ये 1,738 खाटा उपलब्ध
  • यामध्ये ऑक्सिजनयुक्त 1156 खाटा, 372 विलगीकरण खाटा, तसेच 10 खाटा या आपत्कालीन कक्षासाठी राखीव.
  • रुग्णालयात दाखल केलेल्या अर्भकांची तसेच लहान मुलांची काळजी घेण्यासाठी 44खाटांचे मदर लाउंज.
  • 210 अतिदक्षता खाटा असून यातील 50 आयसीयू खाटा लहान मुलांसाठी समर्पित आहे.

Back to top button
Don`t copy text!