आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील रस्त्यांचे जाळे विकसित झाले, तर आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, हे ओळखून महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’चे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे…यानिमित्त हा विशेष लेख.

‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या  पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी (कोकमठाण) या 520 किलोमीटर रस्त्याचे  काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित शिर्डी ते मुंबई हा रस्ता जुलै 2023 पर्यंत खुला करण्यात येणार आहे.  या महामार्गामध्ये राज्यातील दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांचा समावेश असून, सहापदरी असलेल्या या महामार्गाची लांबी 701 किलोमीटर आहे. या महामार्गामुळे 18 तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त 8 तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते;  आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद या प्रवासाचाही वेळ कमी होणार आहे.

घोषणा ते पूर्तता

नागपूर व मुंबई  प्रवास सोयीचा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग  तयार  करणार, अशी घोषणा केली होती.  दि. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाही सुरू झाली. या यंत्रणेने या कालावधीत गतिमान पद्धतीने केलेले काम निश्चितच गौरवास्पद आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये आहे.  या महामार्गांतर्गत एकूण 1901 कामांपैकी 1787 कामे पूर्ण  झाली असून, 114 कामे प्रगतीपथावर आहेत.

वेळेची बचत आणि विकासाचा राजमार्ग

या महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या जनतेच्या जीवनात यामुळे मोठे परिवर्तन घडणार आहे.  या प्रकल्पासाठी भूसंपादन एक वर्षाच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आले.  या रस्त्यामुळे रोजगाराची संधी निर्माण होऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा राजमार्ग निर्माण होण्यास मदत होईल.  प्रवाश्यांच्या आरामासाठी द्रुतगती महामार्गालगत 20 ठिकाणी सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत.  या रस्त्यांमुळे प्रादेशिक बाजारपेठेत वाढ होऊन शेतमालाची जलद वाहतूक होण्यास मदत होईल.  या भागातील उद्योग आणि उत्पादन केंद्रांची क्षमता वाढेल.

हरित महामार्ग

या परिसरातील वन्यजीवांना हानी पोहोचू नये यासाठी 100 वन्यजीव मार्ग तयार करण्यात आले आहेत. वन्यजीवांच्या वावरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणी ध्वनिरोधकाची सोय करण्यात आली आहे. एक हजारांहून अधिक कृत्रिम शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  या रस्त्यालगत 11 लाखांहून अधिक झाडे आणि जवळपास 22 लाखांहून अधिक झुडुपे व वेलींचे रोपण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल.  प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये तसेच अपघात झाला, तर तात्काळ मदत मिळावी यासाठी 15 वाहतूक साहाय्य केंद्रे, बचाव व दुर्घटना नियंत्रणासाठी 21 जलद प्रतिसाद वाहने आणि लाईफ सपोर्ट सिस्टिमसह 21 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील.

वाहनांना तत्काळ इंधन मिळावे यासाठी  देखील खबरदारी घेण्यात आली आहे. 138.47 मेगावॅट सौर ऊर्जा तयार केली जाईल, 22 जिल्ह्यांना गॅस उपलब्धतेची निश्चिती, वाहन चार्जिंग स्टेशनमुळे ऊर्जा बचत होण्यास मदत होईल. वाहनांना टोल आकारणीसाठी ‘फास्ट टॅग’ प्लाझा निर्माण करण्यात येणार आहे. या प्रवासी वाहतुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय सुरक्षित व सुखकर प्रवास व्हावा यासाठी सर्व सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत.  दक्षिण कोरिया सरकारशी झालेल्या करारानुसार या मार्गावर अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पुढील दोन वर्षात द्विपक्षीय निधीद्वारे स्थापित करण्याची योजना आहे. ज्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीला देखील शिस्त लावता येईल.

पाच लाख लोकांना रोजगार

‘कृषी समृद्धी केंद्र’ म्हणून ओळखल्या जाणा-या नवीन शहरांची उभारणी या मार्गावर केली जात आहे.  अशा नवीन शहरांच्या विकासासाठी 18 स्थळे ठरवलेली आहेत. या ठिकाणी कौशल्य विकास केंद्रे, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था आणि आयटी पार्क उभारण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये उभारण्यात आलेले कृषी आधारित उद्योग शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि इतर संधी उपलब्ध करून देतील. या महामार्गामुळे सुमारे 5 लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पर्यटनाला मिळणार चालना

हा  महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी इत्यादी विविध पर्यटन स्थळांना जोडत असल्याने पर्यटनाला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातूनही  मालाची जलद वाहतूक  करण्यास सुलभ  होईल.

भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात सुवर्ण चतुष्कोनची भूमिका मांडली. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकोता ही शहरे चौपदरी महामार्गानी जोडली गेली आहेत. त्याचेच दृश्य परिणाम आज पहावयास मिळत आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जिल्हे जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग.

राज्यात कार्यक्षम, सुरक्षित, वेळेची बचत करणारी, सर्वांना परवडणारी व सर्वांसाठीची अशी उत्तम दर्जाची वाहतूक व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे. बदलत्या काळात महाराष्ट्राला वेगवान प्रगतीसाठी राज्यातील जिल्हे  जोडणारी, उत्कृष्ट दर्जाची वेगवान वाहतूक व्यवस्था करण्यासाठी ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ मोलाची कामगिरी बजावेल.  गतिमान रस्ते विकासातून राज्याच्या विकासाचे शासनाने उचललेले हे पाऊल खूपच आश्वासक आहे.

हा महामार्ग  विकासाचा मार्ग  ठरेल, या महामार्गालगत राहणाऱ्या जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडून येईल, हे मात्र नक्की !

 

सहायक संचालक

संध्या गरवारे खंडारे   


Back to top button
Don`t copy text!