प्रशासकामुळे फलटण शहराचा विकास ठप्प; अधिकाऱ्यांपेक्षा नगरसेवकांकडूनच कामे होत असल्याचे नागरिकांचे मत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । फलटण । गेल्या काही महिन्यांपासून फलटण नगर परिषदेवर प्रशासकराज झाल्याने फलटण शहरातील सर्व विकास कामे ठप्प झाले असल्याची चर्चा सध्या फलटणमध्ये सर्वत्र सुरू आहे. नगरसेवक असताना आपापल्या प्रभागांमधील स्वच्छता व इतर कामे धीम्या गतीने का होईना परंतु मार्गी लागत असल्याचे मत आता नागरिक व्यक्त करू लागलेले आहेत.

फलटण नगर परिषदेमध्ये साधारणपणे डिसेंबर 2021 पासून प्रशासक या नात्याने मुख्याधिकारी हे कामकाज बघत आहेत. परंतु फलटण शहरामध्ये प्रशासक आल्यापासून विविध विकास कामांना खीळ बसली आहे. त्यासोबतच शहरांमधील मूलभूत प्रश्न म्हणजे स्वच्छता त्यासोबतच गटारे व सुनियंत्रित पिण्याच्या पाण्याचे वितरण होताना दिसत नाही. शहराच्या कोणत्याही भागामध्ये गेला तरी पिण्याचे पाणी येण्याची फिक्स असे टायमिंग राहिलेले नाही. त्यामध्ये काही ना काही वेळोवेळी बिघाडच होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याने संपूर्ण शहर हे घाणीचे साम्राज्य झाल्याचे चित्र तयार झालेले आहे. शहरांमधील कोणत्याही भागांमध्ये गेलो तरी कचऱ्याचे ढीग हे तसेच पडलेले दिसत आहेत. त्या ठिकाणी पुन्हा अजून कचरा टाकण्याचे काम तेथील नागरिक करीत आहेत. फलटण नगर परिषदेने रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा करून जर कचरा टाकताना नागरिक आढळला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.

फलटण शहरांमध्ये असणाऱ्या गटारांची चेंबर सतत होणार्या वाहतुकीमुळे तुटल्याने त्या गटर मध्ये पालापाचोळ्यासह इतर कचरा जात आहे. त्यामुळे सदरील चेंबर पॅक होऊन त्यातील घाण पाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. या नगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे शहरातील नागरिकांना साथीच्या आजारांना सुद्धा सामोरे जावे लागत आहे.

या सर्व गोष्टींसोबत फलटण शहरांमध्ये नगरसेवक असताना जी विकास कामे केली जात होती ती विकास कामे आता पूर्णतः ठप्प झालेली दिसून येत आहेत. नगरसेवक असताना आपल्या प्रभागातील विकासकामे ही प्राधान्याने सोडवण्यासाठी सत्ताधारी गटातील असो वा विरोधी गटातील असो, हे प्रयत्न करीत होते. परंतु निवडणुका न झाल्याने व निवडणुका पुढेच जात असल्याने शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे.

नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कालावधी संपल्यानंतर शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रशासकाने कार्यरत राहणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता प्रशासक स्वहिताच्या कामातच गुंग असल्याची जोरदार चर्चा शहरामध्ये सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!