दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । मुंबई । उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांची खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीत घर वापसी झाली आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडूनॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये महत्त्वाचे पद भूषवले होते. परंतु वैचारिक भूमिका न पडल्यामुळे ते वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पाडले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या पक्षाची स्थापना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे निष्ठावंत समर्थक मानले जातात. त्यामुळे ते एक प्रकारे स्वगृही परतले आहेत. त्यांच्या रूपाने मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर असणारा व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून दुरावलेल्या भटक्या – विमुक्त समाजाला आपल्याकडे वळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चित फायदा होईल.
यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.जाती, धर्मात वाद निर्माण करून समाजात द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचार धरेला हरविण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे सांगितले. यासाठी आम्हाला राष्ट्रवादी पक्षाने ताकद देण्याचे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने यांचे सहकारी नारायण जावलीकर, विलास माने, शारदाताई खोमणे, शाबु दुधाळे, मानवेंद्र वैदू, रामकृष्ण माने, नागनाथ अडसूळ, कलावती भाटी, अशोक जाधव, नागनाथ लष्करे, दिगंबर जाधव, शंकर जाधव, राजेंद्र माने, विष्णू गायकवाड, शशांक गायकवाड, हरिदास जाधव, मौला दाढीवाले, रमेश वैदू यांच्यासह संपूर्ण राज्यभरातील अनेक कार्यकर्ते, माता भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.