उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृष्णेचे पाणी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करणार : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्पाला गेल्या दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. आता या प्रकल्पाला एशियन बँकेकडून निधी मिळाला की, येत्या दोन-तीन वर्षांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकल्पाचे पाणी विठ्ठलाच्या चरणापर्यंत आणून सोडतील, असे प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

कृष्णा-भीमा नदीजोड प्रकल्प उद्धट बॅरेज या ठिकाणी आज माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत एशियन बँकेचे पदाधिकारी यांनी भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार रणजितसिंह बोलत होते.

खासदार रणजितसिंह या प्रकल्पाबाबत बोलताना म्हणाले की, कृष्णा-भीमा प्रकल्पाला दोन महिन्यांपूर्वी तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पातील ५१ टीएमसी पाणी सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील काही भागाला देण्याचे ठरले आहे. या प्रोजेक्टला जवळपास १५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाबाबत एशियन डेव्हलपमेंट बँकेला अवगत केले आहे. त्यानुसार एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अधिकार्‍यांची या प्रकल्पाच्या पाहणीसाठी आज आपण भेट घडवून आणली आहे. एशियन बँकेकडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. हा निधी मिळाला की, येत्या दोन-तीन वर्षात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कृष्णेचे पाणी भगवान विठ्ठलाच्या चरणी आणून ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मला खात्री आहे. लवकरात लवकर दुष्काळी भागासाठी हा वरदायी ठरणारा प्रकल्प हातात घेतला जाईल, असे मला वाटते.

जवळपास चार जिल्ह्यातील सव्वालाख हेक्टर क्षेत्र या प्रकल्पातील पाण्याने भिजणार आहे, अशी माहिती खासदार रणजितसिंह यांनी यावेळी पत्रकारांना दिली.


Back to top button
Don`t copy text!