उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘आम्ही कोणाचाही बचाव केलेला नाही, पुराव्यांशिवाय कुणावरही कारवाई केली जाणार नाही’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १६: उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होते आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आजही महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठकी सुरू आहे. दरम्यान आम्ही कुणाचाही बचाव केलेला नाही, पुराव्यांशिवाय कुणावरही कारवाई केली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर आघाडी सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीमधून बाहेर पडताना उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, या प्रकरणात जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही चांगल्या प्रकारे एकत्र काम करत आहोत.’

सचिन वाझेंच्या प्रश्नावर काय म्हणाले अजित पवार?
सचिन वाझे यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले की, ‘या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही कारवाई केली आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून इतर अधिकाऱ्यांविषयी ब्रेकिंग न्यूज येत आहेत. याला हटवण्यात येईल, त्याला हटवण्यात येईल. मात्र सरकार कोणताही निर्णय असाच घेत नाही. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे की, पुराव्यांच्या आधारेच आम्ही एखाद्याला हटवू किंवा त्याच्यावर कारवाई करु. अफवांच्या आधारे कोणावरही कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’

मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही – मलिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये मंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल परब आणि जयंत पाटीलही उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अँटिलिया प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सचिन वाझेंविषयी प्रमुख मंत्र्यांसोबत चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पूर्णविराम देत मंत्रिमंडळात फेरबदल होणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच अधिकाऱ्यांच्या बदल्याही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!