बारामतीचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१६ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला व अतीव दुःख झाले. त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.

महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची, धैर्याची, पराक्रमाची, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. देशसेवेची ही परंपरा कायम राखत वीर जवान अशोक इंगवले यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाहीचे रक्षण करत असताना प्राणार्पण केले. देशाची सेवा बजावताना त्यांनी केलेल्या त्यागास, बारामतीच्या वीर सुपुत्रास सलाम,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर जवान अशोक इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.


Back to top button
Don`t copy text!