निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना भेटी
स्थैर्य, पुणे, दि. 5 : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्याच्या मावळ, खेड आणि जुन्नर तालुक्यातील विविध गावांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.
मावळ तालुक्यातील भोयरे, पवळेवाडी, खेड तालुक्यातील करंजविहीरे, शिवे गावांना भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली.
बाधित शेतकरी, नागरिक, गावकरी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. कोणत्याही बधितांचे नुकसानीचे पंचनामे राहता कामा नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही त्यांनी पाहणी केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
खेड तालुक्यातील करंजविहीरे येथील झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. यावेळी आ. दिलीप मोहिते पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते. करंजविहीरे येथील पॉलिहाऊसचीही त्यांनी पाहणी केली. शिवे येथील स्मशानभूमीतील नुकसानीची तसेच धामणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्रे उडून पडझड झाली. त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. दिलीप मोहिते पाटील, खेडचे उप विभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या सह इतर अधिकारी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळात मृत्यू पावलेल्या पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वाहागाव येथील मंजाबाई अनंता नवले (वय 65 वर्षे) आणि नारायण अनंता नवले (वय 38 वर्षे) यांच्या वारसांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी, सावरगाव येथील द्राक्ष बागेची, पारूंडे, येणेरे येथील आंबा, केळीच्या बागेच्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी खा. डॉ. अमोल कोल्हे, आ. अतुल बेनके, तहसीलदार हनमंत कोळेकर आदी उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील येणेरे-ढगाडवाडी येथील बाळू बबन भालेकर यांच्या नुकसानग्रस्त घराचीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.