दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । सातारा । मुस्लीम समाजाला शैक्षणिक ५ टकके आरक्षण, सामाजिक सुरक्षाकरिता ठोस कायदा, सच्चर कमिटीची शिफारसी, वक्फ बोर्डची जमिनीवर अतिक्रमण काढणे आदी मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीने धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य प्राप्तीस ७५ वर्षे पूर्ण होवूनही मुस्लिमांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीमध्ये कुठलाच बदल झाला नाही. मुस्लिम समाजाला न्यायालयाने ५ टक्के शैक्षणिक आरक्षण मंजूर करुन सुध्दा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, मुस्लिम समाजाला सामाजिक सुरक्षाकरिता ॲट्रोसिटी सारखा कायदा करुन संरक्षण द्यावे, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, व वक्फ बोर्डाला मिळणारा उत्पन्नाचा हिस्सा मुस्लिम समाजाच्या विकासासाठी वापरावा, मुस्लिम समाजातील बेरोगारांना मौलाना आजाद महामंडळाच्या मार्फत उद्योग व व्यवसायासाठी कमीतकमी कागदपत्रे व कमी कालावधीमध्ये आर्थिक सहाय्य करावे, मुस्लिम समाजासाठी स्वायत्त शिक्षण संस्था सुरु करावी, सच्चर कमिटीची शिफारासची अंमलबजावणी तत्काळ करावी, या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास याबाबत प्रबोधन करुन जागरुक करुन महाराष्ट्रव्यापी जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, चंद्रकांत खंडाईत, फारुखभाई पटणी, इम्तियाज नदाफ, गणेश भिसे, प्रताप सपकाळ, सुनिल खरात, किरण गायकवाड, सुधाकर काकडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.