साने गुरुजी यांच्या कार्यावर आधारित कला – साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । मुंबई । साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित कला- साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अंतर्गत येणाऱ्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या प्रकल्पांसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संजय मंगो, कार्याध्यक्ष अमेय तिरोडकर, साने गुरुजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, साने गुरुजी आंतरभारती कलाभवनचे अध्यक्ष युवराज मोहिते, आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अंतर्गत आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग या केंद्राबरोबर संयुक्त विद्यामाने साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला – साहित्य संवाद आयोजनासाठी प्रयत्न करेल. दरवर्षी ट्रस्टमार्फत 24 डिसेंबर या साने गुरुजी यांच्या जन्मदिवसापासून ते 31 डिसेंबर या कालावधीत कला- संवाद कसा आयोजित करण्यात येईल याबाबतचा प्रस्ताव आंतररभारती अनुवाद सुविधा केंद्रामार्फत पाठविण्यात येईल.

मराठीतील उत्तम साहित्याचे अनुवाद जगभरात पोहोचवण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा प्रयत्न असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग मदत करेल. याशिवाय लेखकांना लेखनासाठी निवासी फेलोशिप दिली जावी असा प्रस्ताव देण्यात आला असता याबाबतही राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!