स्थैर्य, नवी दिल्ली, दि.९: नोटाबंदीच्या
निर्णयामुळे काळ्या पैशाचे प्रमाण कमी झाले, कररचना, करभरणा या गोष्टींना
मोठा फायदा झाला तसेच कारभार अधिक पारदर्शक होण्यास मदत झाली असे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
५०० व १००० रुपयांच्या नोटांवर बंदी
घालण्याचा अभूतपूर्व निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६
रोजी जाहीर करून त्याच मध्यरात्रीपासून लागू केला. या निर्णयाला रविवारी
चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की,
नोटाबंदीमुळे ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्यांचा देशाला मोठा फायदा झाला
आहे. नोटाबंदीने कररचना व जीएसटी यांच्यात सुधारणा होण्यास खूप मोठी मदत
झाली, करभरणा वेळेवर होण्याचे प्रमाण वाढले. भारताच्या अर्थव्यवस्थेतील
रोखतेचे प्रमाण कमी झाले.
देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटाबंदीच्या
निर्णयामुळे त्यांच्या भांडवलदार मित्रांचा नक्कीच फायदा झाला. मात्र
देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी
यांनी केली.