दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । सातारा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी , कामगार विरोधी व संविधान विरोधी आहे याच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा ने येत्या २७ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे. त्यास सातारा येथील डाव्या व पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून त्या दिवशी सकाळी बारा वाजता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार दि २७ सप्टेंबर रोजी भारत बंद क्या आवाहनास समर्थन देण्याच्या संदर्भात सातारा येथील एसटी कामगार संघटनेच्या कॉ व्ही. एन. पाटील सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. ही बैठक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा चिटणीस कॉ. माणिक अवघडे यांनी बोलविली होती. प्रारंभी कॉ.माणिक अवघडे यांनी बैठकीचा हेतू विशद केला. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि सोमवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून नंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. –
या बैठकीला विजय निकम , मीनाज सय्यद , ज्ञानदेव कदम , प्रा. विक्रांत पवार , अस्लम तडसरकर , माणिक अवघडे , जयंत उथळे , चैतन्य दळवी यांची उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव , तसेच बळिराजा शेतकरी संघटनेचे नेते साजीद मुल्ला यांनी सुध्दा आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे असे कॉ माणिक अवघडे यांनी सांगितले.