दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त, कृषी महाविद्यालय फलटण येथील अंतिम वर्षातील कृषीदूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत करंजखोप गावातील शेतकर्यांना भाजीपाला जास्त काळ टिकवण्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्षाची उभारणी कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणार्या वस्तूंचा वापर करून करता येते. या शीतकक्षाचा वापर फळांचा व फळभाज्यांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी वापर करता येतो. यामुळे फळे जास्त काळ टिकतात व त्यांची नासाडी टाळता येते. शीतगृहाची उभारणी ही अत्यंत महागडी असून ती सर्वसामान्य शेतकर्याला आर्थिकद़ृष्ट्या परवडणारी नसते. त्यांच्यासाठी शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारणे फायद्याचे ठरते. हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीदूत सौरभ दुधाळ, शुभम बेलदार, सुप्रित लोखंडे, शिवरूप मिंड, सुमित ढोबळे व शुभम दोडमिसे यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.