
दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत फळपिकांना मातीद्वारे खते देण्याचे प्रात्यक्षिक घेतले.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी या प्रात्यक्षिकास श्री. कोल्हे यांची ‘डाळिंब’ फळबाग निवडली. त्याअंतर्गत त्यांनी सुरूवातीला या प्रात्यक्षिकास लागणारी रसायने जसे की, युरिया (नत्र), सिंगल सुपर फॉस्फेट (स्फुरद), म्यूरेट ऑफ पोटॅश (पालाश) यातील रासायनिक घटक यांची माहिती शेतकर्यांना दिली. त्यांनी ही खते पिकाला देण्याची शास्त्रीय पद्धत शेतकर्यांना सविस्तररित्या सांगितली. या रसायनासोबत त्यांनी शेणखताचाही वापर केला.
त्यांनी डाळींब फलोत्पादनासाठी लागणारा एन. पी. के. (नत्र, स्फुरद, पालाश) यांचा योग्य डोस ही ६०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रती वर्ष हा शेतकर्यांना सांगितला.
कृषिकन्यांनी ही खते वापरण्याचे फायदे जसे की, नत्र हे पानातील हरितद्रव्यांचा महत्त्वाचा घटक असून ते झाडाच्या प्रकाश संश्लेषणासाठी उपयुक्त ठरते. तसेच पोटॅश (पालाश) हे फळाची निरोगी वाढ, फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त आहे, हे शेतकर्यांना पटवून दिले. या उपक्रमास शेतकर्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित, प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.