दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२४ | रोहा |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी निसर्गमित्रांनी हिरवळीच्या खतांच्या वापरासंबंधी प्रात्यक्षिक महिपत मांजरे यांच्या भातशेतीमध्ये करून दाखविले.
गिरीपुष्पाच्या पानांचा हिरवळीचे खत म्हणून वापर केल्यास उत्पन्नात भरघोस वाढ होते. ग्रामीण भागात गिरिपुष्प, चवळी, मूग, बर्सिम (चारा पीक), ताग, धेंचा इ. वनस्पती सहज उपलब्ध होतात. ज्यांचा हिरवळीचे खत म्हणून वापर केल्यास पिकाला नत्र, स्फुरद, पालाश तसेच इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. यामध्ये ‘गिरीपुष्प’ या वनस्पतीचा वापर करून उत्पन्न वाढीसंबंधीचे प्रात्यक्षिक शेतकर्यांना दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी सर, ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाधिकारी डॉ. जीवन आरेकर सर व डॉ. विरेश चव्हाण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.