दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जानेवारी महिन्यापासून नियमाने केले जाईल, असे आश्वासन फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिले.
फलटण येथील तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रांताधिकारी डॉ. जगताप बोलत होते. या वेळी तहसिलदार समिर यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, निवासी नायब तहसिलदार सौ. संजिवनी सावंत, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे किसनराव भोसले, मेजर डॉ. मोहन घनवट, किरण बोळे, सोमनाथ मागाडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे स. रा. मोहिते, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, पुरवठा विभागाच्या अव्वल कारकून सौ. मालन कुंभार, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सिराजभाई शेख यांची यावेळी उपस्थिती होती.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने अगामी काळात ग्राहकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. कोरोना कालावधी व निवडणुकांच्या सर्व विभागांच्या आढावा बैठकी थांबल्या आहेत. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या अनुषंगाने व ग्राहक संघटनांच्या मागणीनुसार जानेवारी महिन्यापासून लोकशाही दिन पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. नागरीकांच्या विविध विभागातील कित्येक तक्रारी पडून असतात. लोकशाही दिनाच्या माध्यमातून अशा तक्रारी, समस्या व अडचणी समोर येत असतात. महत्वपुर्ण प्रश्न व तथ्य असणार्या तक्रारींचे निराकरण करण्यावर नक्कीच भर दिला जाईल, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक तहसिलदार समिर यादव यांनी केले. आभार निवासी नायब तहसिलदार सौ. संजिवनी सावंत यांनी मानले.
कार्यक्रमास फलटण नगरपरिषद, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहाय्यक निबंधक, वीज महावितरणसह ग्यास एजन्सीजचे प्रतिनिधी, ग्राहक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.