दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील प्राचीन माळजाई मंदिरात दारू पिऊन अंडी फोडून मंदिराची विटंबना करत वाढदिवस साजरा करणार्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लक्ष्मीनगर येथील ओंकार गणेशोत्सव मंडळाने फलटण शहर पोलिसांकडे केली आहे.
याबाबत माहिती अशी, फलटण येथील माळजाई मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी शेकडो भक्त दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी काही तरुण दारू पिऊन मद्यधुंद होऊन दि. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पूर्व बाजूस केक कापून वाढदिवस साजरा करीत होते. केक कापल्यानंतर या तरुणांनी मंदिराच्या आवारात जाऊन अंडी फोडली व ती अंडी एकमेकांच्या अंगावर फेकत होते. या तरुणांनी मंदिर परिसराची विटंबना केलेली आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्याची गरज आहे. या प्रकारामुळे हिंदू भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. तरी या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लक्ष्मीनगर येथील ओंकार गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.