दैनिक स्थैर्य । दि. 26 सप्टेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील बेरोजगार युवकांना जी. एस. टी. कार्यालयामध्ये नोकरी लावतो असे सांगून बनावट नेमणूक पत्र आणि प्रशिक्षण देऊन सुमारे 116 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे यांनी केली आहे.
या संबंधी अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन आठवडे उलटून गेले तरीही यातील एकाही आरोपीला फलटण शहर पोलीस यांच्याकडून अटक करण्यात आली नसल्याने शिंदे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात युवराज शिंदे यांनी म्हटले आहे की प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्यांना हाताशी धरून शेकडो बेरोजगारांची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची माया गोळा करण्याचे प्रकार फलटण तालुक्यात गत काही महिन्यात वाढीस लागले आहेत. ही बाब खूपच गंभीर आहे. तरी सुद्धा पोलीस अधिकारी कारवाई बाबतीत खूपच उदासीन असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी तत्कालीन फलटण ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडे देखील जी. एस. टी. कार्यालयामध्ये विविध पदावर नोकरी लावतो असे सांगून बनावट नेमणूक पत्र देऊन फसवणूक केल्याच्या काही युवकांनी लेखी तक्रारी दिल्या होत्या त्याचे पुढे काय झाले, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
जीएसटी कार्यालयात विविध पदावर नोकरी लावतो या फसवणूक प्रकरणातील आरोपींचा तपासातील सद्यस्थिती पाहता तसाच काही प्रकार याही प्रकरणात घडला किंवा घडत नाही ना, अशी भीती फसवणूक झालेल्या शेकडो युवकांना वाटत आहे.
फलटण पोलीस राजकीय दबावाखाली ?
जी.एस.टी. प्रकरणातील काही आरोपींचे तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्याशी जवळचे संबंध असल्याची चर्चा फलटण तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.
शेकडो गोरगरीब बेरोजगार युवकांच्या पालकांनी काबाड कष्ट करून अनेक इच्छा मारून पै पै जमा करून दिलेल्या पैशांचा संगनमताने अपहार करून बेरोजगार युवकांच्या स्वप्नांचा चक्का चूर करणार्या प्रवृत्तीविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार आहे. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडणार असून बेरोजगार पीडित युवकांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच पोलीस महासंचालक रजनीश सेट यांना देण्यात आलेल्या आहेत.