दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
बेघर होलार समाजबांधवांना हक्काचे घर बांधण्यासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी फलटण तालुक्यातील होलार समाज संघर्ष समिती, फलटण आणि होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
समाजातील विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमावेळी विविध वाद्य वाजवून आपली उपजीविका करणार्या होलार समाजामध्ये बेघर लोकांचे प्रमाण जास्त आहे. बेघर असल्याने अनेकांनी शासकीय, गायरान व वनक्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले आहे. त्यांना इतरत्र कोठेही जमीन नाही. त्यांच्या नावावर जमीन किंवा घर यापैकी काहीही नसल्याने शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ होलार समाजाला घेता येत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन समितीचे मार्गदर्शक नारायण आवटे यांनी बैठक बोलावून बेघरांची यादी तयार केली.
यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी मनोगत व्यक्त करताना, राज्यातील प्रत्येकाला घर असणे, हा त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे वेळप्रसंगी आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे, असे सांगितले. युवा नेतृत्व संदीप गोरे यांनी होलार समाजातील युवकांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तर आणि तरच आपल्याला समाजाला न्याय देता येईल, असे मत व्यक्त केले.
होलार समाज संघर्ष समिती फलटणचे मार्गदर्शक नारायण आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गोरे आणि होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांच्या नेतृत्वाखाली फलटणच्या तहसीलदारांना धर्मेंद्र जाधव, विलास करे, अमोल आवटे, सुरज गोरे आणि युवा कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.
यावेळी सस्तेवाडी, सुरवडी, निरगुडी, ढवळ, चव्हाणवाडी, टाकळवाडे, चौधरवाडी, मिरगाव, मठाचीवाडी, विडणी, शिंदेवाडी, साखरवाडी, फडतरवाडी, बरड या गावातील होलार समाजबांधव उपस्थित होते.