फ्रिज-एसीची मागणी वाढली; जास्त पैसे मोजावे लागणार!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १३ : गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे नुकसान सोसणाऱ्या कूलिंग उद्योगाला या वर्षी उन्हाळ्याचा हंगाम लवकर सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. उत्तर भारतात फेब्रुवारीअखेरपासून उन्हाळा वाढल्याने वेळेपूर्वी फ्रिज-एसी आदी कूलिंग उत्पादनांची मागणी होऊ लागली आहे. उन्हाळा लवकर सुरू होणे आणि गेल्या वर्षीची थकीत मागणी यामुळे यंदा कूलिंग उत्पादनांची मागणी २०१९ च्या तुलनेत २० टक्क्यांपर्यंत जास्त राहू शकते. मात्र, उद्योगाला कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे या वर्षी इलेक्ट्रॉनिकच्या किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशननुसार, शाळा-महाविद्याय बंद असणे आणि वर्क फ्रॉम होम सुरू राहिल्यामुळे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिकची मागणी वाढली आहे. घरात आधी दिवसा महिला असायच्या, आता मात्र पूर्ण कुटुंब घरात आहे. त्यामुळे प्रत्येक खोलीत एसी किंवा घरात मोठ्या फ्रिजची गरज भासत आहे. देशात सर्वात जास्त एसी विकणारी टाटा समूहाची कंपनी व्होल्टासच्या प्रवक्त्याने सांगितले की, या वर्षी उन्हाळ्याबाबत खूप आशावादी आहे.

कंपन्या आगामी काळातील मागणीबाबत उत्साहित आहेत. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीतील तेजीने त्यांची चिंता वाढली आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्मितीत उपयोग होणारे स्टील, प्लास्टिक, तांबे, अॅल्युमिनियम यासारख्या सामग्रीच्या किमतीही १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक अँड होम अप्लायन्सेस असोसिएशनच्या सूत्रांनुसार, सुट्या भागांच्या किमती वाढण्याचा परिणाम त्यांच्या खर्चावरही पडत आहे. यामुळे या वर्षी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या दरांतही १० ते १२ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. गोदरेज अँड बॉयसचे ईव्हीपी कमल नंदी म्हणाले, आम्ही फेब्रुवारीपासून हळूहळू किमती वाढवायला सुरुवात केली आहे.

ग्राहकांवर ओझे पडू नये यासाठी टप्प्याटप्प्याने किमतीत वाढ केली जाईल. व्होल्टासच्या प्रवक्त्याने हेही सांगितले की, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीचा परिणाम व्हाइट गुड्सच्या(एसी, फ्रिज आदी) किमतींवर होईल. मात्र, असे असतानाही मागणीत घट होणार नाही,अशी त्यांना वाटते.

चारही विभागांत कूलिंग उत्पादनाची मागणी वाढेल
या वर्षी होळीआधीच उन्हाळा सुरू झाला आहे. देशाच्या दक्षिण, पश्चिम, पूर्व, उत्तर चारही विभागांत कूलिंग उत्पादनाची मागणी वेगाने वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे विक्री होऊ शकली नव्हती. मात्र, या वर्षी २०१९ च्या तुलनेत २० टक्के जास्त वाढलेल्या मागणीची अपेक्षा करत आहे. – कमल नंदी, अध्यक्ष, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर असोसिएशन


Back to top button
Don`t copy text!