दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । मुंबई । आजच्या काळात लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल आधीपेक्षा खूप जास्त जागरूक आणि चोखंदळ झाले आहेत. आपण जे पेय पितो त्यातून किती आरोग्य मूल्य मिळते हे जाणून घेण्यासाठी बहुतांश लोक उत्सुक असतात. भारतात पेय उद्योगक्षेत्रातील ट्रेंड्स जाणून घेण्याच्या उद्देशाने गोदरेज फूड ट्रेंड्स रिपोर्ट २०२२ सादर केला आहे.
या क्षेत्रात आता अनेक ब्रँड्स आणि वैविध्यपूर्ण उत्पादनांची रेलचेल चांगलीच वाढली आहे. परिपूर्ण आरोग्य आणि डिटॉक्स नैसर्गिक पद्धतीने घडवून आणण्यासाठी घराच्या घरी फरमेंट करण्यात येणारी पेये बनवून आणि त्यांचा वापर करण्याकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र महामारीपासून सर्रास दिसू लागले आहे. याशिवाय रोस्टरीज आणि कूर्गपासून चिकमंगळूरपर्यंतच्या तसेच देशातील विविध भागांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या आर्टिसनल फार्म टू कप कॉफीचा सुवास देखील देशाच्या घराघरात दरवळू लागला आहे. फेणीसारख्या पारंपरिक पेयांबरोबरीनेच विविध भारतीय लेबल्सच्या चवी भारतीय युवावर्गाच्या आवडीच्या बनत चालल्यामुळे भारतीय स्पिरिट उद्योगक्षेत्रात मागणीने चांगलाच जोर पकडला आहे.
आपण आपल्या पेयांचे सेवन कशाप्रकारे करतो याबाबतच्या संपूर्ण इकोसिस्टिममध्ये बदल घडवून असे काही ट्रेंड्स आणि निष्कर्ष तज्ञांनी या अहवालात मांडले आहेत.
- मूळ भारतीय गोर्मे आर्टिसनल कॉफी/चहाच्या ब्रँड्सच्या मागणीमध्ये वाढ होईल असे अनुमान ५२.४% तज्ञांनी नोंदवले आहे.
- ४७.७% तज्ञांची अपेक्षा आहे की कोल्ड ब्र्यू चहा आणि कॉफी पर्याय जास्त पसंत केला जाईल.
- ५२.४% पॅनलचे मत आहे की, विविध सामग्रींचे मिश्रण असलेली व फ्लेवर्ड (विविध स्वादांचा समावेश करण्यात आलेली) अल्कोहोलिक पेयांविषयी तसेच भारतात तयार करण्यात येणाऱ्या स्पिरिट्सबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुची निर्माण होईल.
- रोगप्रतिकार क्षमता आणि क्रियात्मक आरोग्यामध्ये वाढ करू शकतील अशा आरोग्यदायी पेयांच्या मागणीत वाढ होईल अशी अपेक्षा ३८.५% खाद्यतज्ञांनी व्यक्त केली आहे.
- या उद्योगक्षेत्रातील ४९.२% तज्ञ असे मानतात की, भारतात घरगुती बारटेंडिंगसाठी मिक्सर्सचा वापर वाढेल.
- पाकशास्त्र तज्ञांपैकी ४७.६% जणांची अपेक्षा आहे की, घरी बनवण्यात येणाऱ्या फरमेंटेड पेयांच्या मागणीत वाढ होईल.
- ४७.६% पेय तज्ञांनी अनुमान नोंदवले आहे की, भारतात तयार केल्या जाणाऱ्या स्पिरिट्सच्या मागणीत वाढ होईल.
गोदरेज फूड्स ट्रेंड्स रिपोर्ट २०२२ च्या क्युरेटिंग एडिटर श्रीमती रुशीना मनशॉ घिलडियल यांनी सांगितले, “पेय सेवनाचा अनुभव अगदी सहजपणे घेता येईल अशा सुविधांमार्फत २०२१ मध्ये विविध प्रकारची पेये ग्राहकांच्या घराघरांत पोचली. भरपूर वेळ आणि खर्च करण्याजोगे पैसे हाताशी आल्याने पेयांशी संबंधित आपल्या आवडीनिवडी, छंद पूर्ण करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. आमच्या पॅनेलने असे अनुमान नोंदवले होते की, आपल्या आवडीची पेये, आपल्याला हवी तशी घरात तयार करून घेण्याचे प्रमाण २०२२मध्ये वाढेल. पॅनेलपैकी जवळपास ५०% तज्ञ मानतात की, येत्या काही वर्षांमध्ये मूळ भारतीय आर्टिसनल कॉफी आणि चहाची लोकप्रियता वाढत राहील. घरोघरी होणाऱ्या सोशल गॅदरिंग्समध्ये होम बारटेंडिंगसाठी मिक्सर्सना पसंती दिली जाईल. या क्षेत्रांमधील नवनवीन शोध आणि रोज येणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळे खाद्य व पेय उद्योगक्षेत्राला चालना मिळत राहील आणि घरी तयार करण्यात येणाऱ्या पेय बाजारपेठेची एक मोठी हिस्सेदारी निर्माण होईल. फरमेंट्सविषयी ग्राहकांमध्ये असलेले आकर्षण कमी होणार नाही असा तज्ञांचा अंदाज आहे, छांदिष्ट लोक घरी बनवण्यात येणाऱ्या फरमेंटेड पेयांवर वेगवेगळे, नवनवीन प्रयोग करत राहतील.”