कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणांना पाठीशी घालणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी


दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२३ | फलटण |
कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागांमध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तींनी अतिक्रमणे केली आहेत. अनेक हॉटेलमालकांनी गाळ्याच्या समोरील जागेत अद्यावत व भव्य शेड उभारली आहेत. काहींनी आर.सी.सी.बांधकाम करून शौचालय, पत्र्याचे शेड बांधली आहेत. तसेच पार्किंग म्हणून वापरत असलेल्या जागेमध्ये बेकायदेशीरपणे बोअरवेल खोदलेले आहे. या अतिक्रमणांबाबत तक्रार दिल्यानंतरही दोन वर्षे उलटूनही फलटण पंचायत समितीच्या संबंधित अधिकारी यांनी अद्याप कारवाई न करता अतिक्रमण करणार्‍या व्यक्तींना पाठीशी घातल्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागांवर झालेल्या अतिक्रमणाबाबत सातारा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांनाही निवेदन दिले होते. त्याची दखल घेवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. अर्चना वाघमळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना कोळकी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणांच्या तक्रारींबाबत नियमोचित कार्यवाही करण्याचा लेखी आदेश २०२१ साली दिले आहेत; परंतु यावर संबंधित अधिकार्‍यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याची कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवराज शिंदे यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!