दैनिक स्थैर्य । दि. ०१ एप्रिल २०२३ । फलटण । काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर जी सध्या कारवाई करण्यात आली आहे. ती फक्त आणि फक्त हेतुपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. मोदी सरकार व त्यांचे नेते हे राहुल गांधी यांच्यावर जे खोटे आरोप करत आहेत, असा आरोप राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सचिन बेडके यांनी केला.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सचिन बेडके बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके, कार्याध्यक्ष अमीर शेख, शहराध्यक्ष पंकज पवार यांच्यासह काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून फक्त दोनच उद्योगपतींना मोठे करण्याचे काम केले आहे किंबहुना या दोनच उद्योगपतींसाठी सरकार काम करत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर खोटं बोलून राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम सध्या भाजपा करत आहे. राहुल गांधी यांनी जे प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले आहेत; त्याच उत्तर सुद्धा सरकारच्या वतीने देण्यात आलेलं नाही. उत्तर देण्याऐवजी प्रश्नच पटलावरून काढून टाकण्यात आला आहे, असेही सचिन बेडके यांनी स्पष्ट केले.
सर्व सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना संपवण्याचे काम भाजपा व मोदी सरकार करत आहे. आता तर न्यायालय सुद्धा सरकारच्या मतानुसार निर्णय देत आहोत; ही मोठी शोकांतिका आहे. आता दोन उद्योगपती देश चालवत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. अदानी समूहाचा पैसा म्हणजेच भाजपाचा पैसा आहे काय ? हा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहिला आहे ?, अदानीची पाठराखण मोदी व शहा का करत आहेत; हे सुद्धा स्पष्ट होणे गरजेचे आहे, असेही सचिन बेडके यांनी स्पष्ट केले.