दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘ शेतकरी, गरीब, दलीत यांना न्याय देण्यासाठी ग्रामीण भागातून प्रस्थापितांच्या घढ्या उध्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या बोटामध्ये फार मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे त्याचा योग्य ऊपयोग करा. आपली बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे त्यामुळं आपला कधीही पराभव होणार नाही. जो खरा लढवय्या असतो तो परिणामांची चिंता करत नाही. आपण चळवळीतले कार्यकर्तेे आहोत. सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर समोरच्या उमेदवारांना जमीनदोस्त करुन स्वाभिमानीच्या प्रा.रमेश आढाव यांना विजयी करा’’, असे आवाहन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
फलटण कोरेगांव विधानसभा मतदारसंघातून रोडरोलर या चिन्हावर लढत असलेले संविधान समर्थन समिती आणि राज्यपातळीवरील परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा.रमेश आढाव यांच्या प्रचारार्थ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झालेल्या जाहीर सभेत राजू शेट्टी बोलत होते.
‘‘आपला रोडरोलर बाबासाहेबांच्या विचांराचं व्हिजन पुढे घेवून चालला आहे; त्यामुळे त्याला थोपवण्याची शक्ती अजून जन्माला आलेली नाही. या रोडरोलरने दोन्ही बेचिराख होवून इथला रस्ता साफ होणार आहे. त्या रस्त्यावरुन सामान्य माणूस ताठ मानेने चालणार आहे’’, असा विश्वास राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.
‘‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचं रक्षण करण्यासाठी संविधान समर्थन समिती काम करत आहे. पुढील निवडणूकीत राखीव असलेला हा मतदारसंघ कदाचित खुला होऊ शकतो. त्यामुळे निदान शेवटच्या टप्प्यात तरी बौद्ध समाजाच्या उमेदवाराला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे ही आंबेडकरी विचाराच्या जनतेची इच्छा गैर नाही. सामान्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने परिवर्तन महाशक्ती उभी राहिली आहे म्हणून या ठिकाणी उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला’’, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘फलटणच्या प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढवण्याची हिंम्मत दाखवल्याबद्दल संविधान समर्थन समितीचं अभिनंदन करुन ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते नेहमीच सामान्यांच्या बाजूने लढत असतात. असाच लढा कायम सुरु ठेवा आपला विजय निश्चित होईल’’, असा विश्वासही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
प्रा.रमेश आढाव म्हणाले, ‘‘संविधान समर्थन समितीमार्फत आपण महाविकास आघाडी, महायुती या दोन्ही आघाड्यांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. पण दोघांनीही आपल्याला संधी दिली नाही. राजू शेट्टी यांनी आपल्याला दिलेली संधी आपल्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता निवडणूकीचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. प्रामाणिकपणे काम करुन मला एकदा संधी द्या आणि विजयी करा’’.
दरम्यान, संविधान समर्थन समितीचे सदस्य व नगरसेवक सचिन अहिवळे, सनी काकडे, कपिल काकडे, आकाश आढाव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे यांची भाषणे झाली, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, डॉ.रविन्द्र घाडगे, नगरसेवक सुधीर अहिवळे, महादेव गायकवाड, गंगाराम रणदिवे उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आनंद पवार व विशाल बंडगर यांनी केले.