कोरेगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी दिपाली महेश बर्गे बिनविरोध; उपनराध्यक्षपदी सुनील बर्गे : आ. महेश शिंदे पॅनेलचे निविर्वाद वर्चस्व

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । कोरेगांव । कोरेगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगांव विकास आघाडीच्या दिपाली बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनील बर्गे यांची बिनविरोध निवड झाली.

कोरेगांव नगरपंचायतीमध्ये १७ पैकी १३ जागा जिंकत आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील कोरेगांव विकास आघाडीने एक हाती सत्ता मिळवली होती, तर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राष्ट्रवादीला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले होते. निवडणूक निकालानंतर आज नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोरेगांवच्या उपविभागीय अधीकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानंतर दि. ४ फेब्रुवारीला नगराध्यक्ष पदासाठी कोरेगांव विकास आघाडीच्या सौ. दिपाली बर्गे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता, तर आज सकाळी उपनगराध्यक्षपदासाठीही आघाडीच्या वतीने सुनील बाळासाो बर्गे यांचा एकच अर्ज दाखल झाला, या उमेदवारी अर्जाला राहुल रघुनाथ बर्गे हे सूचक तर साईप्रसाद सुरेश बर्गे हे अनुमोदक होते. दोन्ही जागेसाठी एक एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधीकारी श्रीमती पाटील यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. यावेळी मुख्याधीकारी विजया घाडगे यांनी सहाय्यक निवडणूक अधीकारी म्हणून काम पाहिले.
नगराध्यक्ष निवडीपूर्वी कोरेगांव विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आ. महेश शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत उपनगराध्यक्ष निवडीवर सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी इच्छुक असलेल्या नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मी स्वत:च सुनील बर्गे यांच्या नावाची शिफारस करतो अशी सूचना मांडली. त्यांच्या या भूमिकेमुळे सुनील बर्गे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निवडीनंतर आ. महेश शिंदे यांनी नगरपंचायत कार्यालयात येवून नव्या पदाधीकाऱ्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगांव नगरपंचायतीच्या निवडणूकीत आम्ही जनतेकडे कौल मागितला आणि गेल्या दोन वर्षात केलेल्या रचनात्मक कामाला मतदारांनीही भरभरुन पाठबळ देत एकहाती सत्ता दिली. या विश्वासाला पात्र राहून येत्या काळात कोरेगांव शहराचा कायापालट करुन दाखवू असा विश्वासही आमदार महेश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, कोरेगांव विकास आघाडीचे अध्यक्ष व प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, मार्केट कमेटीचे माजी उपसभापती उदयसिंह बर्गे आदींसह नवनिर्वाचीत नगरसेवक राहुल बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, सागर बर्गे, राजेंद्र वैराट, परशुराम बर्गे, सौ. अर्चना बर्गे, सौ. वनमाला बर्गे, सौ. संगीता ओसवाल, सौ. शितल बर्गे, सौ. स्नेहल आवटे यांच्यासह नगरविकास आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते. निवडीनंतर नुतन पदाधीकाऱ्यांची गुलालाची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!