स्थैर्य, मुंबई, दि.३०: वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील निलंबन कारवाई पुरेशी नसून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे व त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चाने केली आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष श्रीमती उमा खापरे यांनी म्हटले आहे की, दीपालीच्या मारेकऱ्यांना तातडीने पकडले जावे व त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस अश्विनी जिचकार, सौ. सुरेखा लुंगारे, सौ. शिल्पा पाचघरे, मीना पाठक, रश्मी नावंदर, लता देशमुख, अर्चना पखान यांनी जिल्हा प्रशासनाकडे व पोलिसांकडे आग्रही भूमिका घेतली.
शिवकुमार व रेड्डी या दोघांनाही निलंबित करावे या मागणीसाठी आंदोलनही केले होते. महिला मोर्चाच्या दबावामुळे रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र ही कारवाई पुरेशी नसून त्यांना दीपालीच्या आत्महत्या प्रकरणात सहआरोपी केले जाणे आवश्यक आहे. तसेच त्यांची शासनाकडून विभागीय चौकशी करणे गरजेचे आहे. या मागण्या मान्य न केल्यास महिला मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही श्रीमती उमा खापरे यांनी दिला आहे.