दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | “फलटण तालुक्याच्या विकासात गेल्या १५ वर्षात श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून दीपक चव्हाण यांनी चांगले योगदान दिले आहे. कोणतेही चुकीचे काम त्यांनी केलेले नाही. सुशिक्षित आणि चांगला माणूस असल्यानेच शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. यंदाच्या निवडणूकीत कोणतेही मोठे आव्हान समोर दिसत नसून सुमारे ५० हजाराच्या मताधिक्याने ते विजयी होतील”, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ श्रीमंत सौ. शिवांजलीराजे मैदानात उतरल्या असून मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
“श्रीमंत रामराजे यांनी तालुक्यात पाणी आणले आहे, कमिन्स सारखा मोठा उद्योग प्रकल्प आणला आहे, दोन साखर कारखाने पुनरुज्जीवित केले आहेत. सन २००९ साली तालुक्यात धोम बलकवडीचे पाणी श्रीमंत रामराजे यांनी आणले तेव्हा समोरचे विरोधक कुठेच न्हवते. ४-५ किलोमीटरचा कालवा आणायचा आणि आम्ही पाणी आणलं म्हणायचं हे चुकीचं आहे. असं ३-४ वर्षात पाणी येत नसत. ३० वर्षे कष्ट घेऊन रामराजेंनी पाणी आणलं आहे आणि हे तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे”, असेही श्रीमंत सौ. शिवांजलीराजे सांगत आहेत.
“श्रीमंत रामराजे, रघुनाथराजे, संजीवराजे यांच्यासोबत काम करताना आमदार दीपक चव्हाण यांनी मतदार संघातील प्रत्येक गावात आपले योगदान दिले आहे. विकास ही अखंड सुरू राहणारी प्रक्रिया असून त्यासाठी दीपक चव्हाण यांना आपल्याला सलग चौथ्यांदा विजयी करायचं आहे.”, असे आवाहनही श्रीमंत शिवांजलीराजे या करीत आहेत.