
स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयात, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ’ आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, महाविद्यालयाच्याच यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा, खासगी क्षेत्र आणि उद्योजकतेतील संधींबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या तालुका कृषी अधिकारी सौ. अश्विनी कुंभार, बायो फॅक्टर कंपनीचे प्रक्षेत्र विक्री व्यवस्थापक श्री. वैभव पिसाळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम अधीक्षक श्री. सूर्यकांत गुजले आणि वसंत ऍग्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. स्वप्निल पाटील हे यशस्वी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी सौ. अश्विनी कुंभार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अवांतर वाचन, दैनंदिन वृत्तपत्र वाचन आणि व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. श्री. वैभव पिसाळ यांनी खासगी कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि रोजगाराच्या प्रचंड संधी यावर प्रकाश टाकला. श्री. सूर्यकांत गुजले यांनी पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षेची तयारी, गटचर्चेचे महत्त्व आणि मैदानी खेळ व सांस्कृतिक उपक्रमांमधील सहभागातून व्यक्तिमत्व घडविण्याचे आवाहन केले. तर, श्री. स्वप्निल पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात यांसारख्या क्षेत्रांमध्ये उद्योजक बनून यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी, यशस्वी माजी विद्यार्थी हेच महाविद्यालयाचे दिशादर्शक असल्याचे सांगत, नवीन विद्यार्थ्यांनी परिश्रम, वेळेचे नियोजन आणि कौशल्याधारित शिक्षणातून आपले भवितव्य घडवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी धनश्री नाणेकर व कुमारी अश्विनी केंदळे यांनी केले, तर आभार प्रा. एम. व्ही. पवार यांनी मानले.

