कमी होणारा मुलींचा जन्मदर चिंतेची बाब; शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. मुलींचा जन्म दर वाढावा, यासाठी गर्भलिंग चाचण्यांवर निर्बंध, तसेच नियमावली आहे, याची कडक अंमलबजावणी करावी, अशी सूचना पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानादरम्यान आरोग्य विभागाने १८ वर्षांवरील सर्व महिलांपर्यंत पोचून आरोग्य तपासणी करावी. हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ आरोग्य तपासणी अभियानाचा प्रारंभ श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी गर्भलिंग चाचण्यांवर निर्बंध, तसेच कडक नियमावली आहे, याची कडक अंमलबजावणी करावी. रस्त्यांच्या कामावर, बांधकामावर महिला दिसत आहेत. त्यांचीही आरोग्य विभागाने तपासणी करावी. सर्वसामान्य कुटुंबातील किंवा गरीब कुटुंबातील महिला आरोग्य तपासणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी आराखडा तयार करून फिरत्या पथकाद्वारे महिलांची तपासणी करावी. मोहिमेत जिल्ह्यातील १८ वर्षांवरील महिलांनी सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी.’’

या वेळी जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना नवजीवन मिळाल्याबद्दल संबंधित मुलांच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त करत पालकमंत्री यांच्या हस्ते अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले. कार्यक्रमास आरोग्य विभागातील अधिकारी, महिला उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!