दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । मुंबई। बुधवारी स्पॉट गोल्डचे दर ०.३७ टक्क्यांनी वाढून १८०३.४ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकन ट्रेझरी उत्पन्नात घट दिसून आल्याने सराफा धातूचे दर वाढताना दिसले. लोअर बाँड रिटर्नमुळे सोने धारण करण्याची किंमत कमी होते, तथापि डॉलर मजबूत असल्याने सोन्याच्या दरांबाबत खबरदारी बाळगली गेली असल्याचे मत एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.
मागील महिन्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह धोरण बैठकीत, मालमत्ता खरेदीचा प्रोग्राम अपेक्षेपेक्षा लवकर राबवणार असल्याचे निर्देश दिले. तरीही महागाईची वाढती चिंता आणि बेरोजगारीचा वाढता दर ही अमेरिकेतील मध्यवर्ती बँकांची प्रमुख चिंता आहे. कोव्हिड-१९ च्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने प्रमुख अर्थव्यवस्थांवरील लॉकडाऊन वाढवण्याची चिंता वाढली आहे. त्यामुळेही आर्थिक सुधारणा आणखी लांबण्याची चिन्हे आहेत. विषाणूच्या प्रचंड प्रसारामुळे गती मिळालेल्या आर्थिक सुधारणेवर पुन्हा काळे ढग पसरले आहेत. त्यामुळेही सोन्याचे दर वाढलेले दिसून आले.
कच्चे तेल: मंगळवारी, डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.६ टक्क्यांनी घसरले आणि ते ७२.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तर एमसीएक्स क्रूडचे दर १.९ टक्क्यांनी घटले आणि ५३९२ रुपये प्रति बॅरलवर स्थिरावले. ओपेक समूहाने पुढील काही महिन्यातील उत्पादनाच्या भूमिकेबाबत स्पष्टता न दिल्याने तेलाची घसरण सुरूच आहे.
तीन दिवसांच्या बैठकीनंतर तेल निर्यातक समूहाने चर्चा थांबवली. परिणामी बाजारात तेलाच्या पुरवठ्यावर ताण येऊ शकतो, या शक्यतेमुळे आठवड्याच्या सुरुवातीला तेलाचे दर वाढले. सौदी अरेबिया आणि समूहाचे नेते आणि यूएईने करार न केल्यामुळे ओपेक गट वाढत्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी पुरवठा वाढवण्याच्या करारापर्यंत पोहोचू शकला नाही. तसेच आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये डेल्टा संक्रमणात वाढ झाल्याने, महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या निर्बंधांमुळेही तेलाच्या दरांवर दबाव आला.