स्थैर्य, मुंबई, 19 : अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीने अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत दिल्याने बाजारातील भावनांना तसेच गुंतवणूकदारांच्या जोखीमीच्या भुकेला प्रोत्साहन मिळाले. यामुळे गुरुवारी सोन्याच्या किंमती ०.२५ टक्क्यांनी घसरून १७२२.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
अमेरिकेतील विविध राज्यांमधील उद्योग पुन्हा सुरु होत असल्याने बेरोजगारांची संख्याही हळू हळू कमी होत आहे. गुंतवणूकदारांनी अमेरिकी डॉलरचाही आसरा घेतला. कारण कोव्हिड-१९ साथीसारख्या जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीवर मात करण्याकरिता त्याकडे कवच म्हणूनही पाहिले जाते. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांतील दररोजची रुग्णसंख्या अपवादात्मक रितीने जास्तच आहे. त्यामुळे वाढीव सुधारणा काळाबद्दल चिंताही वाढत आहे. या घटकामुळे सोन्याच्या किंमतीतील घसरणीला मर्यादा आल्या.
चांदीच्या किंमती ०.६३ टक्क्यांनी वाढून १७.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सच्या किंमती ०.९७ टक्क्यांनी घसरून ४७,८६१ रुपये प्रति किलोवर स्थिरावल्या.
कच्च्या तेलाच्या किंमती १.२० टक्क्यांनी वाढून ३८ डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. कारण ओपेक देशांनी नियोजित उत्पादन कपातीवर एकमत देण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) अहवालातून, हे स्पष्ट झाले आहे की, जागतिक तेलाचा पुरवठा सुमारे १२ दशलक्ष बॅरलने घटला आहे. तथापि, अमेरिकेतील क्रूड इन्व्हेंटरी लेव्हलमध्ये वाढ झाल्याने या वृद्धीला मर्यादा आल्या. यातून जागतिक बाजारातील मागणी अजूनही कमकुवत असल्याचे दिसून येते.