
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : “राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट, विनाअट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.
या संदर्भात अनिलकुमार कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा यासह राज्यभरात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पिके, फळबागा, भाजीपाला, शेतजमीन यांसोबतच पशुधन, कुक्कुटपालन आणि मेंढपाळांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शेतकरी या अभूतपूर्व नैसर्गिक संकटामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शासनाने खास बाब म्हणून तातडीने नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असेही कदम यांनी आपल्या मागणीत नमूद केले आहे.