दैनिक स्थैर्य । दि. २८ डिसेंबर २०२१ । मुंबई । कोविडमुळे गेले दोन वर्षे लागोपाठ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन आयोजित न करता मुंबई येथेच खबरदारी घेत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे घेण्याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या समन्वयाने निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.
विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशन कालावधीत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दैनिक भत्त्यांमध्ये वाढ होण्याबाबतचा तारांकित प्रश्न आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, नागपूर अधिवेशनात उपस्थित राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या राहण्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येत असल्याने दैनिक भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीसुद्धा या विषयाबाबत पुन्हा एकदा माहिती घेतली जाऊन आवश्यकता वाटल्यास शासन निर्णयामध्ये बदल करण्यात येईल.