धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ३२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, धुळे, दि. १४ : धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा. आपला धुळे जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरील आणि सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेला जिल्हा होय. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी, पांझरा, कान, बुराई, बोरी, अरुणावती, अमरावती नद्यांमुळे जमीन सुपीक आहे. जिल्ह्यातील बहुतांश जमीन काळी कसदार आणि सुपीक अशी आहे. आपल्या या धुळे जिल्ह्यात यंदाही मोसमी पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे. यंदा मोसमी पाऊस वेळेवर सुरू झाला आहे. आपल्या धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०८ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाची परिस्थिती समाधानकारक आहे. धुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे पेरणीलायक क्षेत्र ४ लाख १६ हजार हेक्टर एवढे आहे. त्यापैकी ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील कापूस हे नगदी पीक सर्वाधिक प्रमाणात घेतले जाते. त्याची २ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे, तर मका या पिकाची ५४ हजार ९०० हेक्टर क्षेत्रात लागवड झालेली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रासायनिक खते पोहोचविण्याची योजना राबविण्यात आली होती.

खरीप हंगाम २०१९ मध्ये ७८ हजार शेतकऱ्यांनी ७० हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतलेला होता. त्यापैकी ६६ हजार ७० शेतकऱ्यांना ९७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तसेच खरीप हंगाम २०२० मध्ये ५५ हजार शेतकऱ्यांनी ४० हजार हेक्टर क्षेत्राचा पीक विमा घेतला आहे. हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सन २०१९ मध्ये मृग बहारासाठी १ हजार ९६२ शेतकऱ्यांनी १ हजार ७५७ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला होता. त्यापैकी १ हजार ५९ शेतकऱ्यांना २ कोटी ९७ लाख रुपयांचा फळ पीक विमा मंजूर झाला. तसेच २०१९ मध्ये अंबिया बहारासाठी १ हजार २११ शेतकऱ्यांनी १ हजार ५४३ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला आहे. २०२० मधील मृग बहारासाठी १ हजार २८ शेतकऱ्यांनी ९५६ हेक्टर क्षेत्राचा फळ पीक विमा घेतला आहे. यामध्ये केळी, डाळिंब, लिंबू, मोसंबी या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. तरीही धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. पुढील वर्षी ही संख्या आणखी वाढेल, असा मला विश्वास आहे. आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ योजना व्यापक स्वरुपात राबविली आहे. या योजनेसाठी धुळे जिल्ह्यातून ४९ हजार ३७९ खातेदार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ४२ हजार ४७० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ३२१ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या प्रगतीसाठी पीक कर्ज वितरणाचे आदेश बँकांना देण्यात आले होते. त्याचा आढावा आपले जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी वेळोवेळी घेतला आहे. आपल्या धुळे जिल्ह्यातील ३५ हजार १९० शेतकऱ्यांना २७५ कोटी १५ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे धुळे जिल्ह्यात कापसाचे भरघोस पीक आले. विशेष म्हणजे राज्य शासनाने हमी भावाने सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने कापसाची खरेदी केली आहे. धुळे जिल्ह्यातील १४ हजार ३५२ शेतकऱ्यांकडील ४ लाख ५६ हजार ५५५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यासाठी कापूस पणन महासंघ, सीसीआय यांच्यामार्फत कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्यात आले होते. याशिवाय २ लाख ७० हजार क्विंटल मका, ४४ हजार ४६४ क्विंटल ज्वारी, १४ हजार ८४६ क्विंटल तूर आणि १ लाख ४१ हजार क्विंटल हरभराची खरेदी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला होता. या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बाधित २ लाख ७८ हजार १६७ शेतकऱ्यांना २४४ कोटी ८७ लाख ६ हजार ७५ रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ९४४ शेतकऱ्यांचा डाटा संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. त्यापैकी २ लाख ६९९ एवढ्या शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएसने स्वीकृत केला आहे. त्यापैकी १ लाख ८० हजार २२५ शेतकऱ्यांना पहिला हप्ता, १ लाख ७४ हजार २६२ शेतकऱ्यांना दुसरा हप्ता, १ लाख ५८ हजार ८९० शेतकऱ्यांना तिसरा हप्ता, १ लाख ३३ हजार २९५ शेतकऱ्यांना चौथा हप्ता, तर ५५ हजार ७९९० शेतकऱ्यांना पाचवा हप्ता अशाप्रकारे अनुदान करण्यात आले आहे. तसेच त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना शिवभोजनाचा आधार मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील ही योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. आपल्या धुळे जिल्ह्यात आतापर्यंत १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २ लाख २० हजार गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. शिवभोजनाची थाळी सध्या पाच रुपयांना मिळत आहे. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो मोफत धान्य तसेच प्रती कार्ड एक किलो तूरडाळ किंवा चनाडाळ प्रती कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने खासकरून एपीएल (केशरी) कार्ड धारकांना सवलतीच्या दरात ८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत २५ हजार ४८३ टन गहू, ३९ हजार ७८ टन तांदूळ, ८२८ टन डाळीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना करण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, असे नागरिक, स्थलांतरित, बेघर मजुरांना प्रती व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना १ लाख ७९ हजार २२३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असूनही शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे यातून दिसून येते.

गेल्या मार्च २०२० पासून संपूर्ण मानवाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगरविकास शाखा, पोलीस अधीक्षकांसह महसूल विभागास ५ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात राज्य आपत्ती निवारण निधी, गौण खनिज निधी आणि जिल्हा वार्षिक योजनेतील निधीचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना नागरिकांचीही चांगली साथ मिळत आहे. आता एकच लक्ष्य आहे ते म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखणे. त्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. तसेच कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यात माध्यमांचेही चांगले सहकार्य मिळाले आहे. त्यांनी वेळोवेळी नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम केले आहे. ते सुद्धा कोरोना योद्धेच आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखतानाच दैनंदिन जनजीवन सुरळीत व्हावे म्हणून राज्य शासनाने ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून दैनंदिन जनजीवन सुरळीत होण्यास मदत होत आहे. तसेच आगामी काळात संपूर्ण जनजीवन सुरळीत होईल, असा मला विश्वास आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्हावासियांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा म्हणजे करावाच. माझी धुळेकरांना एवढीच विनंती कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केले पाहिजेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!