दुधेबावी अपघातातील गंभीर जखमी महिलेचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२३ | फलटण |
दुधेबावी, तालुका फलटण गावच्या हद्दीत फलटण ते दहिवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता स्पीड ब्रेकरवरून मोटारसायकल उडाल्याने झालेल्या अपघातात मिरेवाडी (ता. फलटण) येथील महिला गंभीर जखमी झाली होती. त्या महिलेचा पुणे येथे उपचार घेत असताना काल मृत्यू झाला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसात तिचे पती अरविंद चव्हाण (राहणार मिरेवाडी, तालुका फलटण) यांच्यावर प्राणांकित अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघाताची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दुधेबावी, तालुका फलटण गावच्या हद्दीत फलटण ते दहिवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता अरविंद चव्हाण (राहणार मिरेवाडी, तालुका फलटण) हे हिरो मोटारसायकल (क्रमांक एमएच-४२ एन ५२३) वरून त्यांची पत्नी शांताबाई अरविंद चहाण (वय ५५, रा. मिरेवाडी, ता. फलटण, जि.सातारा) यांना घेऊन त्यांचे पाहुणे मोगराळे, ता.माण, जि.सातारा येथे बारशाचा कार्यक्रम असल्याने निघाले होते. त्यांची मोटारसायकल जिल्हा परिषद शाळा दुधेबावी येथे आल्यानंतर स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाल्याने पाठीमागे बसलेल्या शांताबाई अरविंद चव्हाण या मोटारसायकलीवरून खाली डोक्यावर पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना प्रथम लाईफ लाईन हॉस्पिटल फलटण व नंतर मॅक्स न्युरो हॉस्पीटल पुणे येथे उपचारासाठी दाखल केले होते; परंतु उपचार सुरू असताना काल त्यांचा मृत्यू झाला.

या अपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी मोटारसायकल चालक अरविंद आप्पा चव्हाण (वय ५९, रा. मिरेवाडी) यांच्यावर पत्नी शांताबाई यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!