दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले आमरण उपोषण सोडल्यानंतर फलटण येथील मराठा क्रांती मोर्चानेही प्रांताधिकारी कार्यालयात सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगण्यात आले.
फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाचे २५ ऑटोबरपासून उपोषण सुरू होते. आज सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविणार असल्याचे सांगितल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यानंतर फलटण येथील प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण मागे घेण्याचे मोर्चाच्या पदाधिकार्यांना विनंती केली. त्यानुसार मराठा क्रांती मोर्चाने आपले आमरण उपोषण मागे घेतले. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
आमरण उपोषण मागे घेतेवेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे व युवा नेते सह्याद्री कदम व इतर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.