
स्थैर्य, दि.३१: केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा दिला आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता फास्टॅग लावण्याची मुदत 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आता वाहनचालकांना 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये फास्टॅग लावता येईल. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी चार चाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. पण, वाहन चालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.
फास्टॅग कुठे मिळेल ?
फास्टॅग ही टोल भरण्याची इलेक्ट्रॉनिक, संपर्करहित यंत्रणा आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी टोलनाक्यावर विविध बँकांचे एजंट आणि एनएचएआयमार्फत काऊंटर लावण्यात आले आहेत. NHAI आणि 22 वेगवेगळ्या बँकेतून तुम्ही फास्टॅग खरेदी करू शकता. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे.